Indian Premier League 2024 (Live Cricket Score, GT vs DC) : आज बुधवारी(24 एप्रिल) आयपीएल 2024 मधील 40वा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरूध्द गुजरात टायटन्स याच्यांत खेळला गेला.अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र, अखेर दिल्लीने 4 धावांनी विजय मिळवला. गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात 19 धावा करायच्या होत्या. पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन चौकार मारले गेले. त्यानंतर गुजरातला चार चेंडूत केवळ 11 धावा करायच्या होत्या. मात्र त्यानंतर राशिद खानला केवळ सहा धावा करता आल्या. 220 धावा केल्यानंतर गुजरातला 4 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 4 गडी गमावून 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकांचा खेळ संपल्यानंतर 8 बाद 220 धावाच करू शकला.गुजरातचा दिल्लीविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी अहमदाबादमध्येही दिल्लीने गुजरातविरुद्ध सहा विकेट्सने विजय मिळवला होता.
गुजरात टायटन्ससाठी डेव्हिड मिलरने तुफानी खेळी खेळली. या फलंदाजाने 23 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या, मात्र संघाला विजयापर्यंत नेण्यात तो अपयशी ठरला. डेव्हिड मिलरशिवाय साई सुदर्शनने 39 चेंडूत 65 धावांचे योगदान दिले. तर वृद्धिमान साहाने 25 चेंडूत 39 धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये राशिद खानने 11 चेंडूत 21 धावा केल्या, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
दिल्ली कॅपिटल्सकडून रसिक दार सलामने सर्वाधिक 3 बळी घेतले. कुलदीप यादवला 2 यश मिळाले. याशिवाय एर्निक नोरखिया, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 224 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार ऋषभ पंतने 43 चेंडूत 88 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले. तर अक्षर पटेलने 43 चेंडूत 66 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय शेवटच्या षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्सने शानदार फलंदाजी करत 7 चेंडूत 26 धावा केल्या.
44-3, phir shuru hui 𝗥𝗣🤝𝗔𝗣 ki Aatishbaazi 🔥 pic.twitter.com/MfW5SQVFra
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 24, 2024
विशेषत: ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी शेवटच्या 4 षटकांमध्ये तुफानी फलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी शेवटच्या 24 चेंडूत 97 धावा केल्या. ऋषभ पंतने मोहित शर्माच्या 20व्या षटकात 31 धावा केल्या, ज्यात त्याने 3 षटकार ठोकले. याआधी 19वे षटक टाकण्यासाठी आलेल्या साई किशोरने 6 चेंडूत 22 धावा दिल्या. अशाप्रकारे शेवटच्या 12 चेंडूत 53 धावा झाल्या.
पंत आणि पटेल यांनी सांभाळली डावाची धुरा…
ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्यात 113 धावांची भागीदारी झाली. मात्र, त्याआधी नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क 14 चेंडूत 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पृथ्वी शॉ 7 चेंडूत 11 धावा करून तर शाई होपने 6 चेंडूत 5 धावा करून तंबूत परतला. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 5.4 षटकांत 44 धावांत 3 गडी गमावल्यानंतर संघर्ष करत होता. मात्र यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेलने डावाची सुत्रे आपल्या हाती घेत संघाला अडचणीतून बाहेर काढत मोठी धावसंख्या उभारली.
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीची स्थिती….
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, संदीप वारियर हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. संदीप वॉरियरने दिल्ली कॅपिटल्सच्या 3 फलंदाजांना आपला बळी बनवले. त्यानं 3 षटकात 15 धावा दिल्या. याशिवाय नूर अहमदने 3 षटकात 36 धावा देताना 1 गडी बाद केला. मोहित शर्माने 4 षटकात सर्वाधिक 73 धावा दिल्या, मात्र या गोलंदाजाला यश मिळाले नाही. राशिद खानने 4 षटकात 35 धावा दिल्या. तोही विकेट घेण्यात अपयशी ठरला.