IPL 2024 (SRH vs CSK Match 18) : आयपीएल 2024 चा 18 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. सनरायझर्स हैदराबाद संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकला. सीएसकेचा या मालिकेतील हा सलग दुसरा पराभव आहे. सनरायझर्स पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतले आहेत.
या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना CSK ने 5 गडी गमावून 165 धावा केल्या. यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने 18.1 षटकात 4 गडी गमावून 166 धावा करत लक्ष्याचा पाठलाग केला.
एडन मार्करामने अर्धशतकी खेळी खेळून संघासाठी योगदान दिले. हैदराबादसाठी एडन मार्करामने 36 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. संघाला अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने वेगवान सुरुवात केली, त्याचा फायदा संघाला झाला. अभिषेक शर्माने 37 धावांची शानदार खेळी केली. त्याने 12 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकार लगावले. ट्रॅव्हिस हेडने 31 धावा केल्या. यादरम्यान चेन्नईकडून गोलंदाजी करताना मोईन अलीने 2 बळी घेतले. दीपक चहर आणि महिश थेक्षाना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
IPL 2024 (SRH vs CSK Match 18) : दुबे-जडेजाची उत्कृष्ट कामगिरी, चेन्नईचे हैदराबादसमोर माफक आव्हान…
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सीएसकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावा केल्या. कर्णधार रुतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी सीएसकेच्या डावाची सुरुवात केली. रवींद्र काही वादळ निर्माण करण्याआधीच भुवनेश्वर कुमारने त्याला 12 धावांवर बाद केले. गायकवाडही अतिशय संथपणे खेळताना दिसला, त्याने 21 चेंडूत केवळ 26 धावा केल्या. अजिंक्य रहाणेनेही 35 धावांचे योगदान दिले, परंतु त्याच्या स्ट्राइक रेटवर टीका होऊ शकते कारण त्यानं 35 धावांसाठी 30 चेंडू घेतले.
अशा स्थितीत शिवम दुबे पुन्हा एकदा गोलंदाजांची धूलाई करण्याच्या मूडमध्ये क्रीझवर आला. त्याने 24 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी केली. दुबेने 2 चौकार आणि 4 षटकार मारले. मात्र तो बाद झाल्यानंतर फलंदाज मोठे फटके खेळण्यात अपयशी ठरले. रवींद्र जडेजा 23 चेंडूत 31 धावा करून नाबाद राहिला. त्याने 4 चौकार मारले.
दरम्यान, 15 षटके पूर्ण झाल्यानंतर सीएसकेची धावसंख्या 4 गडी बाद 127 धावा होती. विशेषतः शेवटच्या 5 षटकांमध्ये SRH कडून अतिशय अचूक व प्रभावी गोलंदाजी झाली. जेथे संघ डेथ ओव्हर्समध्ये जोरदार फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो तेथे चेन्नईला मात्र, पुढील 3 षटकांत केवळ 25 धावा करता आल्या. 19व्या षटकात भुवनेश्वर कुमारने दाखवून दिले की त्याच्याविरुद्ध धावा काढणे अजिबात सोपे नाही. त्याने 19व्या षटकात केवळ 6 धावा दिल्या. 20व्या षटकात धोनीही फलंदाजीला आला, पण संघाला फक्त 7 च धावा काढता आल्या अन् 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली .
हैदराबादकडून गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने 4 षटकात केवळ 28 धावा देऊन 1 बळी घेतला, तर जयदेव उनाडकट आणि पॅट कमिन्स यांनीही आपापल्या 4 षटकात 29 धावा देत प्रत्येकी 1-1 बळी घेतला. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये एसआरएचच्या गोलंदाजांनी शानदार खेळ केला. जर कमिन्सने 18व्या षटकात 13 धावा दिल्या नसत्या तर SRH चेन्नईला आणखी कमी धावसंख्येपर्यंत रोखू शकले असते. कारण शेवटच्या 5 षटकांपैकी इतर 4 मध्ये 25 धावा झाल्या.