Live Cricket Score, SRH vs CSK, Indian Premier League 2024 : आज पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) समोर आहे सनरायझर्स हैदराबाद, ज्यांनी आयपीएलच्या या मोसमात या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएल 2024 हंगामातील 18 वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना 7.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांना त्यांच्या मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे सीएसके आणि हैदराबाद विजयी ट्रॅकवर परत येण्याकडे लक्ष देतील.
युवा फलंदाज शिवम दुबेच्या 24 चेंडूत 45 धावा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या 23 चेंडूत नाबाद 31 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावा केल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सीएसकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार रुतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी सीएसकेच्या डावाची सुरुवात केली. रवींद्र काही वादळ निर्माण करण्याआधीच भुवनेश्वर कुमारने त्याला 12 धावांवर बाद केले. गायकवाडही अतिशय संथपणे खेळताना दिसला, त्याने 21 चेंडूत केवळ 26 धावा केल्या. अजिंक्य रहाणेनेही 35 धावांचे योगदान दिले, परंतु त्याच्या स्ट्राइक रेटवर टीका होऊ शकते कारण त्यानं 35 धावांसाठी 30 चेंडू घेतले.
अशा स्थितीत शिवम दुबे पुन्हा एकदा गोलंदाजांची धूलाई करण्याच्या मूडमध्ये क्रीझवर आला. त्याने 24 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी केली. दुबेने 2 चौकार आणि 4 षटकार मारले. मात्र तो बाद झाल्यानंतर फलंदाज मोठे फटके खेळण्यात अपयशी ठरले. रवींद्र जडेजा 23 चेंडूत 31 धावा करून नाबाद राहिला. त्याने 4 चौकार मारले.
दरम्यान, 15 षटके पूर्ण झाल्यानंतर सीएसकेची धावसंख्या 4 गडी बाद 127 धावा होती. विशेषतः शेवटच्या 5 षटकांमध्ये SRH कडून अतिशय अचूक व प्रभावी गोलंदाजी झाली. जेथे संघ डेथ ओव्हर्समध्ये जोरदार फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो तेथे चेन्नईला मात्र, पुढील 3 षटकांत केवळ 25 धावा करता आल्या. 19व्या षटकात भुवनेश्वर कुमारने दाखवून दिले की त्याच्याविरुद्ध धावा काढणे अजिबात सोपे नाही. त्याने 19व्या षटकात केवळ 6 धावा दिल्या. 20व्या षटकात धोनीही फलंदाजीला आला, पण संघाला फक्त 7 च धावा काढता आल्या अन् 165 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली .
हैदराबादकडून गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने 4 षटकात केवळ 28 धावा देऊन 1 बळी घेतला, तर जयदेव उनाडकट आणि पॅट कमिन्स यांनीही आपापल्या 4 षटकात 29 धावा देत प्रत्येकी 1-1 बळी घेतला. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये एसआरएचच्या गोलंदाजांनी शानदार खेळ केला. जर कमिन्सने 18व्या षटकात 13 धावा दिल्या नसत्या तर SRH चेन्नईला आणखी कमी धावसंख्येपर्यंत रोखू शकले असते. कारण शेवटच्या 5 षटकांपैकी इतर 4 मध्ये 25 धावा झाल्या.