IPL 2024 (RCB vs GT Match 52) : विराट अन् डू-प्लेसिसची तूफानी खेळी, बेंगळुरूचा गुजरातवर शानदार विजय..

RCB vs GT Match Result : आयपीएल 2024 च्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने गुजरात टायटन्सचा 4 गडी राखून पराभव केला. गुजरातने प्रथम खेळून 147 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने 13.4 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. बेंगळुरूचा 11 सामन्यांमधला हा चौथा विजय असून 8 गुणासह ते गुणतालिकेत 10व्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचले आहेत.या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिसने 23 चेंडूत 64 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय विराट कोहलीने 27 चेंडूत 42 धावांचे योगदान दिले. विराट कोहलीने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 4 षटकार मारले.
मात्र, विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले, मात्र यानंतर दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंग यांनी आरसीबीला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिक 12 चेंडूत 21 धावा करून नाबाद परतला. तर स्वप्नील सिंग 9 चेंडूत 15 धावा करून नाबाद परतला. दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंग यांच्यात 18 चेंडूत 35 धावांची भागीदारी झाली.
गुजरात टायटन्ससाठी जोशुआ लिटल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. जोशुआ लिटलने 4 षटकात 45 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय नूर अहमदला 2 यश मिळाले.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा डाव 19.3 षटकांत सर्वबाद 147 धावांवर आटोपला. गुजरात टायटन्सकडून शाहरुख खानने सर्वाधिक 37 धावा केल्या. याशिवाय राहुल तेवतियाने 35 आणि डेव्हिड मिलरने 30 धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून मोहम्मद सिराजशिवाय यश दयाल आणि विजयकुमार वशाक यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. करण शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.





