सातारा (प्रतिनिधी) – शहरातील मल्हारपेठेतील राऊत मिठाईवाले यांच्या साखरगाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही परदेशी मराठी कुटुंबांसाठी रवाना झाल्या असून यावर्षी या साखरेच्या गाठ्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी, दुबई, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन या ठिकाणी तेथे सध्या वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांकडून आग्रही मागणीवरून पाठवण्यात आल्या असल्याची माहिती भरतशेत राऊत यांनी दिली.
वर्षानुवर्ष मिठाई मध्ये पारंगत असलेल्या राऊत परिवारातर्फे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्री महाकाय आकाराच्या नऊ फूट उंचीच्या व नऊ अशा पदकांची सुरेख कलाकुसर असलेल्या आणि सजावट केलेल्या साखरगाठी देवदेवतांना घालण्यासाठी भेट स्वरूपात दिल्या जातात.
जिल्ह्यात सर्वात मोठ्या प्रमाणात साखरगाठी बनवणारे राऊत कुटुंबीय यांच्याकडे दरवर्षी नगर जिल्ह्यातून ही गाठी बनविणारे कसबी कलाकार सुमारे दीड महिने अगोदरच येऊन ही साखरगाठीची कला प्रत्यक्षात उतरवून हजारो किलोची साखरगाठी बनवतात .
साखरेच्या पाकापासून तयार केलेली ही अतिशय गोड साखरगाठी लाकडी साच्यामध्ये व्यवस्थितपणे दोऱ्यामध्ये ओवून अतिशय सुबकतेने त्यात साखरेचा पाक ओतून तो थंड झाल्यावर ही साखरगाठी तयार होते. अतिशय निष्णात कलाकारच हा साखरेचा पाकाबरोबर साच्यात बनवून होतात. राऊत यांच्या कारखान्यांमध्ये दोरीला टांगलेल्या या हजारो गाठ्या पाहताना एक वेगळेच नववर्षाचे चैतन्य जागृत होताना दिसते.
परदेशात उभारलेली मराठी बांधवांची गुढी आपल्या साखरी गाठीने सजते याचा विशेष आनंद आपल्याला होत असून दरवर्षी ही गाठी अतिशय काळजीपूर्वक हाताळत परदेशात किंवा बाहेर गावात बाहेर जिल्ह्यात नेताना खाकी पुठ्ठ्याच्या खोक्यामध्ये चिरमुरे घालून त्यात व्यवस्थित पॅकिंग करून दिल्या जातात. किरकोळ विक्रीसाठी या गाठ्या नगावर विकल्या जातात ,तर ठोक व होलसेल आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी या साखरगाठ्या किलोवर विक्री केल्या जातात.
विविधरंगी साखरगाठी उपलब्ध
अगदी दहा रुपयापासून ते सुमारे एक हजार रुपयापर्यंत किंमत असणाऱ्या या साखरी गाठीसाठी गुलाबी, पिवळ्या, केशरी आणि पांढरा रंगांमध्ये पाच पदके, सात पदके, नऊ पदकाची ही गाठी बनवली जाते. नारंगी भगव्या अर्थात केशरी आणि गुलाबी रंगात बनवलेल्या या गाठ्यांना विशेष मागणी असते.
विविध तीर्थक्षेत्रासाठी साखरगाठी
दरवर्षी सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्रीक्षेत्र सज्जनगड, तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर, वाईचा ढोल्या गणपती, फलटण येथील नाईक निंबाळकर घराण्याचे श्रीराम मंदिर तसेच शहरातील पंचमुखी गणेश मंदिर या ठिकाणी या साखरी गाठ्या भेट म्हणून राऊत परिवाराकडून पाठविल्या जातात, अशी ही माहिती यावेळी भरत शेठ राऊत यांनी दिली.