IPL 2024 (RR vs SRH Match 50, Live Score) : आयपीएल 2024 मधील 50 व्या सामन्यात गुरूवारी (2मे) गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना IPL इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादशी झाला. दोन्ही संघांमधील हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा एका धावेने पराभव केला.
एकेवेळ राजस्थान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. 14व्या षटकातच धावसंख्या 140 च्या जवळपास होती. शेवटच्या 18 चेंडूत विजयासाठी 27 धावा पाहिजे होत्या आणि मग त्यानंतर विजयासाठी शेवटच्या चेंडूवर दोन धावा करायच्या होत्या. तरीही हैदराबादने हा सामना एका धावेने जिंकला. हैदराबादने प्रथम खेळून 201 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ 20 षटकांत 7 बाद केवळ 200 धावाच करू शकला.
यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांच्यातील 133 धावांच्या भागीदारीने आरआरला विजयाच्या जवळ आणले होते, तरीही संघ विजयाची नोंद करू शकला नाही. यशस्वी जैस्वालने 40 चेंडूत 67 धावा केल्या, ज्यात त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. रियान परागने 49 चेंडूत 77 धावांची शानदार खेळी खेळली, ज्यात त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले.
राजस्थानला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती, पण भुवनेश्वरने रोव्हमन पॉवेलला बाद करून हैदराबादला विजय मिळवून दिला. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने तीन विकेट घेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह हैदराबादने दोन महत्त्वाचे गुण घेतले, तर राजस्थानची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची प्रतीक्षा वाढली.
राजस्थानचा 10 सामन्यांमधला हा दुसरा पराभव असून तो 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. हा सामना जिंकण्यात राजस्थानला यश आले असते तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरले असते, पण संघाला तसे करता आले नाही. दुसरीकडे, हैदराबाद संघ 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ पाचव्या स्थानावर घसरला आहे.
तत्पूर्वी, नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेडचे अर्धशतक आणि हेनरिक क्लासेनच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सविरूध्द 20 षटकांत 3 गडी गमावून 201 धावसंख्येपर्यत मजल मारली होती.
Innings Break!
A 🎯 of 2️⃣0️⃣2️⃣ for #RR courtesy of counter attacking fifties & a finishing act from #SRH 👏
Scorecard ▶️ https://t.co/zRmPoMjvsd #TATAIPL | #SRHvRR pic.twitter.com/92E9FfYYoA
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2024
दरम्यान, हैदराबादची सुरुवात खूपच खराब झाली. आवेश खानने अभिषेक शर्माला बाद करून हैदराबादला सुरूवातीलाच मोठा धक्का दिला. पुढच्याच षटकात अनमोलप्रीत सिंग संदीप शर्माचा बळी ठरला, त्यामुळे हैदराबादवर दबाव वाढला. अभिषेक 12 तर अनमोलप्रीत फक्त 5 धावा काढून बाद झाला. पहिल्या 6 षटकात त्यांची धावसंख्या 2 विकेट्सवर केवळ 37 धावा अशी होती. यानंतर नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमण करत तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली.
ट्रॅव्हिस हेड 44 चेंडूत 58 धावा करून परतला. त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 3 षटकार आले. तर नितीश रेड्डीने 42 चेंडूत 76 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 8 षटकार आले. तर हेनरिक क्लासेनने 19 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले.
डावाच्या पहिल्या 10 षटकांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीचे वर्चस्व होते, मात्र पुढच्या 10 षटकांत हैदराबादच्या फलंदाजांनी तुफानी शैलीत फलंदाजी केली. पहिल्या 10 षटकांत हैदराबादला 2 गडी गमावून केवळ 75 धावा करता आल्या होत्या. पण शेवटच्या 10 षटकांत 1 विकेट गमवाताना हैदराबादच्या फलंदाजांनी 126 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची कामगिरी…
राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 4 षटकात 39 धावा देत 2 बळी घेतले. त्याच्याशिवाय संदीप शर्माने 4 षटकात 31 धावा देत 1 बळी घेतला. ट्रेंट बोल्ट आणि रविचंद्रन अश्विनने चांगली गोलंदाजी केली, पण युझवेंद्र चहलने 4 षटकात 62 धावा दिल्या.