IPL 2024 (MI vs CSK Match 29) : वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 चा 29 क्रमांकाचा सामना खेळला गेला. चेन्नईने हा सामना 20 धावांनी जिंकला. मुंबई इंडियन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मानेही नाबाद शतक झळकावले मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. याशिवाय या सामन्यात काही खास मोठे विक्रमही झाले. जाणून घेऊया, सर्व रेकॉर्डस…
1. रोहित शर्माचे 500 षटकार : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने आपल्या T20 कारकिर्दीत 500 षटकारांचा टप्पा पार केला. हिटमॅनने CSK विरुद्धच्या सामन्यात आपल्या डावातील तिसरा षटकार ठोकून T20 मध्ये आपले 500 षटकार पूर्ण केले. हा आकडा गाठणारा रोहित हा पहिला भारतीय आणि एकूण पाचवा फलंदाज ठरला. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1056 षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. या यादीत किरोन पोलार्ड (860), आंद्रे रसेल (678), काॅलिन मुनरो (548) यांचा अनुक्रमे दुसरा,तिसरा आणि चौथा क्रमांक लागतो. रोहितनंतर सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू विराट कोहली (383) आहे.
2. धोनीच्या 5 हजार धावा : एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना 5 हजार धावा पूर्ण केल्या. धोनीने मुंबईविरुद्ध 20* धावांची नाबाद खेळी खेळली, ज्याद्वारे त्याने 5 हजार धावांचा आकडा गाठला. चेन्नईसाठी 5 हजार धावा करणारा धोनी दुसरा फलंदाज ठरला. खरं तर, धोनीने मुंबईविरुद्ध 4 धावा केल्या, तेव्हा चेन्नईसाठी आयपीएलमध्ये 5000 धावा करणारा तो सुरेश रैनानंतरचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी सुरेश रैनाच्या नावावर आयपीएलमध्ये चेन्नईकडून 5000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम आहे. रैनाच्या आयपीएलमध्ये सीएसकेसाठी 200 सामन्यांमध्ये 5529 धावा आहेत. आता धोनी आणि रैना यांच्याशिवाय या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी कोणीही खेळाडू आसपास नाही. टॉप 5 बद्दल बोलायचे झाले तर तिसऱ्या स्थानावर फाफ डू प्लेसिस, मायकेल हसी चौथ्या स्थानावर आणि मुरली विजय पाचव्या स्थानावर आहे. डू प्लेसिसने सीएसकेसाठी 2932 धावा केल्या आहेत, हसीने 2213 धावा केल्या आहेत आणि मुरली विजयने 2205 धावा केल्या आहेत.
3. सीएसकेसाठी धोनीचा 250 वा सामना : एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जसाठी 250 सामने खेळला आहे. हा आकडा गाठणारा तो चेन्नईचा पहिला खेळाडू ठरला. मुंबईविरूध्द सामन्यासाठी मैदानात उतरताच त्याने हा विक्रम आपल्या नावे केला. आयपीएल फ्रँचायझीसाठी 250 सामने खेळणारा तो इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी फक्त विराट कोहलीने एका फ्रँचायझीसाठी (RCB) 250 हून अधिक सामने खेळले आहेत.
4. मथिशा पाथिराना : मुंबई विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने चार षटकात 28 धावा देऊन 4 बळी घेतले, यासह तो चेन्नईसाठी चार बळी घेणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. वयाच्या 21 वर्षे 118 दिवसात पाथीरानाने ही कामगिरी केली.
5. मुंबईसाठी अशी कामगिरी करणारा रोहित हा पहिला खेळाडू : रोहितचे आयपीएलमधील हे दुसरे शतक ठरले. त्याचवेळी त्याने वानखेडेवर आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. यापूर्वी 2012 मध्ये हिटमॅनने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन्सवर 109 धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्याचवेळी मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमधील हे सातवे शतक ठरले. आयपीएलमध्ये एकापेक्षा जास्त शतके झळकावणारा रोहित हा मुंबईचा एकमेव फलंदाज आहे. त्याच्याशिवाय सनथ जयसूर्या, सचिन तेंडुलकर, लेंडल सिमन्स आणि कॅमरून ग्रीन यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.
IPL 2024 (MI vs CSK Match 29) : रोहितची शतकी खेळी व्यर्थ, चेन्नईने मुंबईला 20 धावांनी केलं पराभूूत…
6. ऋतुराज गायकवाड : ऋतुराजने मुंबईविरुद्ध 5 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 69 धावांची खेळी खेळली आणि आयपीएलमध्ये 2000 धावाही पूर्ण केल्या. आणि या लीगमध्ये सर्वात वेगवान 2000 धावांचा आकडा गाठणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला आणि त्याने केएल राहुलचा विक्रमही मोडला. ऋतुराज गायकवाडने या लीगमध्ये 57 डावात 2000 धावा पूर्ण केल्या तर केएल राहुलने 60 डावांमध्ये ही कामगिरी केली. एकंदरीत, तो आयपीएलमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आला आहे.
IPL मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारे भारतीय फलंदाज
57 (डाव) – रुतुराज गायकवाड
60 – केएल राहुल
63 – सचिन तेंडुलकर
64 – ऋषभ पंत
68 – गौतम गंभीर
IPL मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारे फलंदाज
48 (डाव)- ख्रिस गेल
52 – शॉन मार्श
57 – ऋतुराज गायकवाड
60 – केएल राहुल
63 – सचिन तेंडुलकर
7. ऋतुराजने एमएस धोनीचा मोडला विक्रम…
आयपीएलमध्ये चेन्नईचा कर्णधार म्हणून मुंबईविरुद्ध सर्वात मोठी इनिंग खेळण्याची कामगिरी ऋतुराज गायकवाडने केली. त्याच्या आधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता ज्याने मुंबईविरुद्ध कर्णधार म्हणून 63 धावांची नाबाद इनिंग खेळली होती, मात्र आता ऋतुराजने 69 धावांची खेळी करत धोनीचा विक्रम मोडला.