Sharad Pawar | Ajit Pawar | Lok Sabha Election 2024 : राज्याचं राजकारण ज्या ‘पवार’ नावाभोवती फिरतं, त्यावरून सध्या मोठाच वाद पेटला आहे. ‘मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार’ अशी टिप्पणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता केली अन् लेक अन् सुनेत केलेल्या फरकावरून सध्या अजित पवार गटाकडून चांगलीच टीका होताना दिसत आहेत. अजित पवारांच्या लग्नाला 39 वर्षे झाली तरीही सून बाहेरची कशी, असा प्रश्न शरद पवारांना महिला नेत्यांनी केला होता.
दरम्यान, आता आपल्या या विधानावरून शरद पवारांनी घुमजाव केल्याचं पाहायला मिळाला आहे. शरद पवार यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच आपण तसं वक्तव्य केलंच नव्हतं, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, “मी तसं बोललेलो नव्हतो. मी जे बोललो होतो, पत्रकाराने विचारलं, अजित पवार यांनी काही भाषण केलं होतं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की, जनतेनं मला निवडून दिलं. त्यांना स्वत:ला निवडून दिलं, ताईला निवडून दिलं,
आता सूनेला निवडून द्या. त्यापुढे त्यांनी आणखी काही वाक्य वापरलं. त्याच्या संबंधित मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळा काही अर्थ काढण्याची गरज नाही..” असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं.
नेमका हा वाद पेटला कसा?
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत म्हणाले होते की, “तुम्ही मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. त्यानंतर साहेबांना मतदान केलं, नंतर मुलगी सुप्रिया सुळे यांना मतदान केलं. आता सुनेला मतदान करा. म्हणजे पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल.
मी सांगतो पवार दिसेल त्या ठिकाणीच मतदान करा. शरद पवारांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर आपल्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले की, पवार आडनावाला मतं द्या. यात चुकीचं काय?
कोण आहेत सूनबाई?
सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशिवच्या तेर गावच्या आहेत. त्या मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. पद्मसिंह पाटलांच्या त्या बहीण आहेत. सुनेत्रा पवार यांचं वडिलांकडील नाव सुनेत्रा बाजीराव पाटील असे आहे.
बारामतीत पवार विरुद्ध पवार; राजकीय वातावरण तापलं….
बारामतीत राजकीय वातावरण तापलं आहे. कारण या मतदारसंघात पवार कुटुंबातले दोन सदस्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत.
तर शरद पवार यांच्याकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहेत. एकाच कुटुंबातले दोन जण एकाच मतदारसंघात समोरासमोर निवडणूक लढवत असल्याने या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.
ही बातमी नक्की वाचा….
“आजपर्यंत तुम्ही फक्त साहेबांना आणि मुलीला मतदान केलं, आता….”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन