पुणे – अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या रामलला स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे पुणे महानगर समितीच्या वतीने घरोघरी जाऊन या सोहळ्याच्या अक्षता वितरण आणि निमंत्रण अभियानास एक जानेवारीला शुभारंभ झाला. या अभियानातंर्गत पुण्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह उद्योजक, धार्मिक प्रमुख आणि अन्य मान्यवरांना अक्षता वितरण आणि निमंत्रण देण्यात आली.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीच्या वतीने एक ते १५ जानेवारी या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात ११ लाखांहून अधिक घरांमध्ये हे गृहसंपर्क अभियान होणार आहे. अभियानाच्या पहिल्या दिवशी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पालकमंत्री अजित पवार, कॅम्प गुरुद्वाराचे अध्यक्ष चरणजीतसिंह साहनी, रेंजहिल्स येथील गुरुद्वाराचे ग्यानी जसबीर सिंगजी, जैन मुनी श्री उपाध्याय, श्री गौतम मुनीजी महाराज, प्रसिद्ध उद्योजक कायनेटिक समूहाचे अध्यक्ष अभय फिरोदिया, बजाज ऑटोचे संजीव बजाज यांच्यासह अनेक मान्यवरांना अक्षता देऊन निमंत्रण देण्यात आले. यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी हे अभियान कशा रितीने होणार आहे आणि त्याचा तपशीलवार माहिती घेतली.