बारामती (प्रतिनिधी) – शहर व तालुक्यातील त्या ५ कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील ५४ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बारामती शहर व तालुक्यात एकाच दिवसात कोरोनाचे ६ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील ५४ जणांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
शहरातील अशोकनगरमधील एका वकिलांच्या पत्नीसह शहरातील ज्येष्ठ नगरसेवकांचा मुलगा व तांबेनगरमधील एक रहिवासी . तसेच, कोरोनाग्रस्त झालेल्या आयटी अभियंत्याचे तालुक्यातील काटेवाडी येथील एक मित्र , तर सावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुणे शाखेत कार्यरत एक कर्मचारीही दि. (४) रोजी कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले होते.
बारामती शहरात सुरुवातीच्या काळात भीलवाडा तसेच बारामती पॅटर्नचा अवलंब करून बारामती शहर पूर्ण मुक्त करण्यात आले होते. लॉक डाउन शिथिल केल्यानंतर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आली. त्यानंतर दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. बारामती शहर व तालुक्यात उपाययोजनांची कडक् अंमलबजावणी करण्यात यावीअशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर आणि सॅनेटायझरचा वापर करावा, अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.