मंचर -गंगापूर खुर्द (ता. आंबेगाव) येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे 7 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत घरमालक भीमसेन नथू येवले यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
भीमसेन नथू येवले हे आपल्या घरी एकटेच राहत असून त्यांची मुले कामानिमित्त बाहेर असतात. मंगळवारी (दि. 30) भीमसेन येवले आजारी असल्यामुळे ते कळंब (ता. आंबेगाव) येथील आपल्या मुलीकडे दोन दिवस राहण्यासाठी गेले होते. गुरुवारी (दि. 2) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरी गंगापूर खुर्द येथे आले.
त्यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावलेले कुलूप दिसले नाही. दरवाजाला कडी लावली असल्याने ते आत गेले असता आतमधील सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यांनी याबाबत आपला मुलगा सदानंद, मुलगी वर्षा यांना फोन करून चोरी झाल्याचे कळवले.
भीमसेन येवले यांच्या घरातील 1 लाख रुपये किंमतीचा 60 इंची एलइडी टीव्ही, 25 हजार रुपये किंमतीचा 42 इंची एलईडी टीव्ही, 75 हजार रुपये किमतीची साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चैन, 27 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लहान गंठण, 45 हजार रुपये किमतीची सोन्याची कोल्हापुरी फॅन्सी माळ, 50 हजार किमतीचे दोन तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ, 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, 75 हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 8 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण 7 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे.
याबाबत भीमसेन येवले यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस करीत आहेत.