सांगवी-दापोडीस जोडणाऱ्या पुलाची माहितीच गायब

प्रशासनाची निष्क्रियता : माहिती अधिकारात बाब उघड

पिंपरी – जुनी सांगवी येथील पवना नदीवरील सांगवी दापोडीला जोडणाऱ्या पुलाची महापालिकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते युवराजसिंह गायकवाड यांनी माहिती अधिकारात याबाबत माहिती मागितली होती.

महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे सांगवी-दापोडीला जोडणाऱ्या पूलाबाबत गायकवाड यांनी माहिती मागितली होती. हा पूल अतिशय जुना व अरुंद आहे. या पूलाचे आयुष्यमान, सद्यस्थिती व भविष्यकालीन योजना याविषयी 20 ऑगस्ट 2019 रोजी माहिती अधिकारात सविस्तर माहिती मागवली होती. त्यावेळी महापालिका आयुक्तांना निवेदनही दिले होते. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाने साधारण 1981-82 साली या पूलाचे रुंदीकरण केल्याचे पुलालगत लावलेल्या कोनशीलावरून दिसून येते.

सांगवी गावाचा पिंपरी चिंचवड महापालिकेत साधारण 1986 साली समावेश करण्यात आला. मात्र 32 वर्षांनंतरही महापालिकेकडे या पूलाबाबत कोणतीही माहिती नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या पूरामध्ये हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. महापालिकेच्या वतीने या पुलाच्या शेजारी सन 2001 साली नवीन पुलाची उभारणी केली.त्यानंतर या पूलाचा वापर बंद करण्यात आला.

मात्र आजही नागरिक या पूलावर दुचाकीवरून जातात. अनेक तरूण फिरण्यासाठी तसेच सेल्फी काढण्यासाठी येथे जातात. या धोकादायक पूलाचे आयुर्मान सद्यस्थिती याविषयी गायकवाड यांनी माहिती मागवली होती. पूलाच्या डागडुजीबद्दल व कठडे उभारणीबाबत महापालिकेचे काय धोरण आहे याबाबतही प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, माहापालिकेकडे या पूलाबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)