नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीतील सर्वात महत्वाचा अधिकार असलेल्या माहितीच्या अधिकाराअंतर्गत कोणकोणती माहिती मिळवता येते याबाबत सतत चर्चा होत असली तरी भारतातीलच एका पत्नीने या अधिकाराचा वापर करुन आपल्या पतीच्या पगाराचा तपशील मिळवला आहे.
संजू गुप्ता असे या महिलेचे नाव असून वारंवार मागणी करूनही तिचा पती तिला पगाराची माहिती देत नव्हता किंवा तिला आपली सॅलरी स्लिपही दाखवत नव्हता. अखेर तिने माहितीच्या अधिकाराचा वापर करून हा सर्व तपशील मिळवला. भारतात अशा प्रकारची घटना प्रथमच घडली आहे.
संजू गुप्ताने प्रथम तिचा पती ज्या कार्यालयात काम करत होता. तिथे अर्ज दाखल करून आपल्या पतीच्या पगाराची माहिती मागवली पण तेथील माहिती अधिकाऱ्याने अशा प्रकारची माहिती देता येणार नाही. असे सांगून तिचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर संजूने अपील अधिकाऱ्याकडे अर्ज करून ही माहिती पुन्हा एकदा मागवली.
अपील अधिकाऱ्यांनीही संजू गुप्ताचा अर्ज फेटाळून लावला त्यानंतर संजू गुप्ताने शेवटचा उपाय म्हणून सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजेच केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज दाखल केला. केंद्रीय माहिती आयोगाने आज पर्यंत झालेले विविध निकाल आणि माहिती अधिकारातील तरतुदींचा आधार घेऊन तिचा अर्ज मंजूर केला आणि पतीने आपल्या पगाराचे सर्व तपशील तिला सादर करावेत असा आदेश दिला.
कायद्याप्रमाणे पती आणि पत्नीला एकमेकांच्या उत्पन्नाची माहिती असणे बंधनकारक आहे. जर पती किंवा पत्नीने एकमेकांना अशाप्रकारे आपल्या उत्पन्नाची माहिती दिली नाही तर माहितीच्या अधिकाराचा वापर करून पती किंवा पत्नी ही माहिती मिळवू शकतात असे या निकालाने समोर आले आहे.
पत्नीने कधीही आणि कोठेही पतीला जर आपली सॅलरी स्लिप मागितली तर पतीला ते पुरवणे बंधनकारक आहे. फक्त त्याच्याकडे ती उपलब्ध नसेल तर त्याला जेव्हा सॅलरी स्लिप उपलब्ध होईल, तेव्हा ती त्याने पत्नीला देणे महत्त्वाचे आहे माहिती अधिकारात आत्तापर्यंत सरकारी खात्यांच्या संबंधितच माहिती मागवली जाऊ शकते असा समज असला तरी या प्रकरणामुळे आता महत्वाची खाजगी माहिती सुद्धा दिली जाऊ शकते असे सिद्ध झाले आहे.