Women Cricket, India vs Australia 3rd T20 in Mumbai : भारतीय महिला क्रिकेट संघ उद्या म्हणजेच मंगळवारी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच घरच्या मैदानावर टी-20 मालिका जिंकायची आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून 2024 च्या T20 विश्वचषक वर्षाची सुरुवात विजयी करण्याची भारताला संधी आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच पैकी फक्त एक टी-20 मालिका जिंकली आहे, तर चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने 2015-16 मध्ये ऑस्ट्रेलियात एकमेव मालिका जिंकली होती.
हरमनप्रीत कौरचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे. भारतीय कर्णधाराला सर्व फॉरमॅटमध्ये गेल्या 10 सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावण्यात अपयश आले आहे. गेल्या 11 डावांत ती सात वेळा दुहेरी आकडा गाठण्यातही अपयशी ठरली आहे. दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू दीप्ती शर्माने बॉल आणि बॅट दोन्हीत चांगली कामगिरी केली, पण भारताला विजय मिळवून देण्यात ती अपयशी ठरली. तिने 27 चेंडूत 31 धावा करून भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिले दोन विकेटही काढले, पण ते संघाला विजयासाठी पुरेसे नव्हते.
पहिल्या दोन टी-20 सामन्यांच्या खेळपट्टीवर फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळाली नाही. विशेषत: पहिल्या डावात गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. अशा परिस्थितीत मंगळवारी खेळपट्टीचे स्वरूप काय आहे आणि नाणेफेक कोण जिंकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तिसरा T20 सामना संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, अमनजोत कौर, श्रेयंका पाटिल, मन्नत कश्यप, सेइका इशाक, रेणुका सिंह ठाकुर, टिटास साधु, पूजा वस्त्राकर, कनिका आहूजा आणि मीनू मणि.
ऑस्ट्रेलिया : डार्सी ब्राउन, हीथर ग्राहम, एशले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हैरिस, एलिसा हीली (कर्णधार ), जेस योनासेन, एलेना किंग, फोएबे लिचफील्ड, ताहलिया मैकग्रा, बेथ मूनी, एलिस पैरी, मेगन शुट्ट, एनाबेल सदरलैंड आणि जॉर्जिया वेयरहैम.