IND-W vs AUS-W 2nd T20I Result : तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला आहे. अशा प्रकारे तीन टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत झाली आहे. ऑस्ट्रेलियासमोर सामना जिंकण्यासाठी 131 धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाने 19 षटकात 4 विकेट गमावत 133 धावा करत सामना जिंकला. कांगारूंसाठी एलिस पेरीने सर्वाधिक नाबाद 34 धावा केल्या. त्याचवेळी फोबी लिचफिल्ड 18 धावा करून नाबाद माघारी परतली.
ऑस्ट्रेलियन सलामीवीराची दमदार सुरुवात…
भारताच्या 131 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर अॅलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. एलिसा हिलीने 26 धावा केल्या. तर बेथ मुनीने 20 धावांचे योगदान दिले. ताहिला मॅकग्राने 21 चेंडूत 19 धावा केल्या. 10 चेंडूत 7 धावा करून ऍशले गार्डनर पूजा वस्त्राकरच्या गोलंदाजीवर बाद झाली. भारताकडून दीप्ती शर्मा ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. दीप्ती शर्माने 4 षटकात 22 धावा देत 2 फलंदाज बाद केले. याशिवाय श्रेयंका पाटील आणि पूजा वस्त्राकर यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.
Australia win the 2nd T20I by 6 wickets and level the series 1⃣-1⃣
It all comes down to the decider on Tuesday 🏟️
Scorecard ▶️ https://t.co/ar0sCktbHa#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/kC1TjtUtKn
— BCCI Women (@BCCIWomen) January 7, 2024
भारतीय फलंदाजांनी केली निराशा…
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकात 8 विकेट गमावत 130 धावा केल्या. भारताकडून अष्टपैलू दीप्ती शर्माने 27 चेंडूत सर्वाधिक 30 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. रिचा घोषने 19 चेंडूत 23 धावा केल्या. त्याचवेळी सलामीवीर स्मृती मानधना हिने 26 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. मात्र याशिवाय हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्जसारख्या फलंदाजांनी निराशा केली. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ, अॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहम यांनी 2-2 विकेट घेतल्या. तर, अॅशले गार्डनरने 1 बळी घेतला.
शेफाली-जेमिमाची नाही चालली बॅट
दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर शेफाली वर्माच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. तिला किम गर्थने एलबीडब्ल्यू केले. शेफालीला एकच धाव करता आली. तिच्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज क्रिजवर आली आणि तिने नऊ चेंडूत 13 धावा केल्या. किम गर्थच्या चेंडूवर तीला अॅलिसा हिलीने झेलबाद केले.
मंधाना आणि हरमनप्रीतही ठरल्या अपयशी
स्मृती मंधानाच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. 26 चेंडूत 23 धावा करून ती बाद झाली. मंधानाला अॅनाबेल सदरलँडने एलिस पेरीच्या हाती झेलबाद केले. तिच्यापाठोपाठ हरमनप्रीत कौरही पॅव्हेलियनमध्ये परतली. तिने 12 चेंडूत सहा धावा केल्या. अॅशले गार्डनरच्या चेंडूवर ती अॅलिस पॅरीकरवी झेलबाद झाली. रिचा घोष (23) हिला जॉर्जिया वेअरहमने एलबीडब्ल्यू (LBW) आऊट केले.
दीप्तीने भारताला 130 धावांपर्यंत पोहोचवले
पूजा वस्त्राकर नऊ धावा करून वेरहॅमच्या चेंडूवर बाद झाली. अमनजोत कौर (चार धावा) अॅनाबेल सदरलँडकरवी ताहलिया मॅकग्राकडे झेलबाद झाली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर दीप्ती शर्मा बाद झाली. तिने 27 चेंडूत 30 धावा करत टीम इंडियाला 130 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने पाच चौकार मारले. श्रेयंका पाटील सात धावा करून नाबाद राहिली.
INDW vs AUSW 2nd T20 : मंधाना-हरमनप्रीत फेल; भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचे लक्ष्य…
तिसरा टी20 सामना मंगळवारी…
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव केला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. आता दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे 3 टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. उभय संघांमधील मालिकेतील तिसरा सामना 9 जानेवारी रोजी होणार आहे.