India vs Australia 2ND ODI Score Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये होत आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्या
झंझावती शतकी तर सूर्यकुमार यादव आणि कर्णधार राहूल यांच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 5 बाद 399 धावा करत ऑस्ट्रेलियानपुढं विजयासाठी 400 धावाचं मोठं लक्ष्य ठेवलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधली ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या 383 धावा होती, जी त्यांनी नोव्हेंबर 2013 मध्ये बेंगळुरूमध्ये केली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या :-
धावसंख्या ठिकाण वर्ष
399/5 इंदूर, 2023
383/6 बेंगळुरू, 2013
362/1 जयपूर, 2013
358/9 मोहाली, 2019
354/7 नागपूर, 2009
त्याचवेळी, एकूण वनडेमधली ही भारताची सातवी सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची सर्वोच्च धावसंख्या 418/5 आहे, जी त्यांनी डिसेंबर 2011 मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. इंदूरच्या मैदानावर ही भारताची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
एकदिवसीय सामन्यात भारताची सर्वोच्च धावसंख्या :-
धावसंख्या विरूध्द स्थान वर्ष
418/5 वेस्टइंडिज, इंदूर, 2011
414/7 श्रीलंका, राजकोट, 2009
413/5 बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, 2007
409/8 बांगलादेश, चट्टोग्राम, 2022
404/5 श्रीलंका, ईडन गार्डन्स, 2014
401/3 दक्षिण आफ्रिका, ग्वाल्हेर, 2010
399/5 ऑस्ट्रेलिया, इंदूर, 2023
भारताकडून शुभमन गिलने 97 चेंडूत 104 धावा, श्रेयस अय्यरने 90 चेंडूत 105 धावा आणि कर्णधार केएल राहुलने 38 चेंडूत 52 धावा केल्या. त्याचवेळी इंदूरमध्ये अखेर सूर्यकुमार यादवचे वादळ पाहायला मिळाले. त्याने 37 चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजा 13 धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये 24 चेंडूत 44 धावांची भागीदारी झाली. भारताने शेवटच्या पाच षटकात 54 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत कॅमेरून ग्रीनने दोन बळी घेतले. त्याचबरोबर जोश हेझलवूड, शॉन अॅबॉट आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
श्रेयस अय्यरनंतर शुभमन गिलनेही शतक झळकावल्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. त्याने 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले. तर श्रेयसने 90 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 105 धावांची खेळी केली. शुभमन आणि श्रेयसमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी झाली.
गिलचे सहावे शतक…
श्रेयस अय्यरनंतर इंदूरच्या होळकर स्टेडियमवर शुभमन गिलचाााही जलवा पाहायला मिळाला. त्याने 92 चेंडूत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे तर एकूण नववे शतक झळकावले. वनडेतील सहा शतकांव्यतिरिक्त त्याने कसोटीत दोन आणि टी-20मध्ये एक शतक झळकावले आहे.
अय्यरचे तिसरे शतक
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये परतला आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 86 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे आणि एकूण चौथे शतक होते. वनडे व्यतिरिक्त श्रेयसने कसोटीतही शतक झळकावले आहे.