नवी दिल्ली – मोबाईल (Mobile) चोरांच्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील लोक चोरीचे मोबाईल दिल्लीहून पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात (Bangladesh) पाठवत असत.
ब्ल्यू डॉट कुरिअरद्वारे आतापर्यंत 2,240 स्मार्ट एनक्रिप्टेड मोबाईल बांगलादेशला पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. बांगला देशात पाठवण्यात आलेल्या या मोबाईलची किंमत सुमारे 5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या टोळीतील तीन आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 112 प्रीमियम क्लास मोबाईल (आयफोनसह सॅमसंग व इतर) जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पश्चिम बंगालमधूनही एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांनी अखिल अहमद आणि नवाब शरीफ यांना संशयास्पद बॅगसह अटक केली. त्यांच्या दोन्ही बॅगची झडती घेतली असता 112 चोरीचे महागडे फोन सापडले, हे सर्व फोन एकतर दिल्ली एनसीआरमधून चोरीला गेले होते किंवा लोकांकडून हिसकावले गेले होते.
अखिल अहमद आणि नवाब हे दोघे चोरलेले मोबाईल ब्ल्यू डॉट कुरिअरद्वारे बांगलादेशला पाठवाणार होते. आतापर्यंत दोघांनी ब्लू डॉट कुरिअरद्वारे पश्चिम बंगालमधून बांगलादेशात 160 पार्सल पाठवले आहेत.
एका पार्सलमध्ये 14 फोन होते. अशाप्रकारे या दोघांनी आतापर्यंत 2,240 मोबाईल पाठवल्याचे उघड झाले असून, त्याची किंमत अंदाजे 5 कोटी रुपये आहे.
अटक केलेल्या दोन्ही आरोपींची चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पश्चिम बंगालमधून साबीर सरदार नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.