PM Narendra Modi And Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सध्या अनेक दिग्गज नेत्यांच्या आपल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा होत आहे. यावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रातील सभांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर एका मुलाखतीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. उद्या संकट आले तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल’, असे विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले PM नरेंद्र मोदी?
“उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, उद्या जर त्यांच्यावर काही संकट आले तर मी पहिला व्यक्ती असेन जो त्यांची मदत करेन. बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून मी उद्धव ठाकरेंचा मानसन्मान करत आलो आणि यापुढेही करत राहील. पण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी मी जगेन, माझ्यावर त्यांचे अतिशय प्रेम होते. मी ते कर्ज विसरू शकत नाही. आज आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. माझी बाळासाहेबांना वाहिलेली ती श्रद्धांजली आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणालेत.
“आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मला उद्धव ठाकरे यांनी कितीही शिव्या दिल्या तरी, मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन,” अशी मोदींनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्रात भावनिक बाजू महायुतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, अधिकृतपणे राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. घराणेशाहीच्या सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली. मुलाला पुढे आणण्यासाठी बाळासाहेबांचे विचार बाजूला गेले. शिवसैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण आयुष्य खर्ची घातलं. ती बाळासाहेबांची शिवसेना आज आमच्यासोबत आहे,” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारधारे विरोधात
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारे विरोधात गेले आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्या आणि ओरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचा मुलगा बसतो याचा राग लोकांमध्ये आहे. बाळासाहेबांनी जे सांगितले त्याच्याविरुद्ध जात सत्तेच्या लालसेपोटी त्यांचा मुलगा काय करतो हे पाहून लोकांमध्ये चीड निर्माण झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा:
शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्सने पार केला ७५ हजारांचा टप्पा, तर निफ्टी नवीन उच्चांकावर…