नवी दिल्ली : भारतातून निर्यात होणाऱ्या संरक्षण सामग्रीत लक्षणीय वाढ झालेली असून आता भारत अनेक देशांना शस्त्रास्त्रे तसेच दारूगोळ व अन्य संरक्षण सामग्री निर्यात करू लागला आहे. त्यामुळे शस्त्रास्त्रे विकणाऱ्या जगभरातील पहिल्या 25 देशांमध्ये भारताचा समावेश होऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया धोरणाची अंमलबजावणी केल्याने त्याची फळे आता विविध क्षेत्रात दिसू लागली आहेत. संरक्षण क्षेत्र त्यापैकीच एक. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या 2021 च्या अहवालानुसार शस्त्रास्त्र निर्यातीच्या क्षेत्रात भारत जगातील देशांमध्ये 24 व्या स्थानावर पोचला आहे.
2012 ते 2016 च्या तुलनेत 2017 ते 2021 या कालवधीत भारताच्या शस्त्रास्त्र निर्यातीत दुपटीने वाढ झालेली आहे. जगातील शस्त्रास्त्र व्यापारातील भारताचा वाटा फक्त 0.2 टक्के एवढाच असला तरी शस्त्रास्त्र निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत 24 व्या स्थानावर आहे. अलीकडच्या काळात भारताने अनेक देशांशी संरक्षणविषयक करार केले. त्यामध्ये फिलिपाईन्स, व्हिएतनाम आणि आर्मेनियाचा समावेश आहे. भारताने आर्मेनियाशी दोन हजार कोटी रुपयांची शस्त्रास्त्र सामग्री पुरवण्याचा करार केला आहे. त्याअंतर्गत भारताने आर्मेनियाला क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि दारूगोळा दिलेला आहे. फिलिपाईन्सबरोबर 37.4 कोटी रुपयांचा करार करण्यात आलेला आहे. त्याअंतर्गत भारत फिलिपाईन्सला ब्राह्मोस क्षेपणास्त्रे देणार आहे.
अशाच पद्धतीने शस्त्रास्त्र निर्यातीबाबत व्हिएतनामशी चर्चा सुरू आहे. हा करार झाल्यास भारत व्हिएतनामलाही ब्राह्मोस क्षेपणास्त्रे निर्यात करणार आहे. त्याखेरीज अनेक छोट्या देशांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून या बाजारपेठत स्थान मिळवण्याचा प्रयत्न भारताकडून सुरू आहे. भारतातून शस्त्रास्त्रे आयात करणाऱ्यांमध्ये म्यानमार, श्रीलंका आणि मॉरिसशचा समावेश होतो. म्यानमारच्या शस्त्रास्त्र आयातीतील 17 टक्के शस्त्रे व दारूगोळा भारतातून आयात केला जातो.
सध्या शस्त्रास्त्रे निर्यात करणाऱ्यांमध्ये अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि जर्मनी यांचा वरचा क्रमांक लागतो. या देशांनी मिळून 2017 ते 2021 या कालावधीत झालेल्या निर्यातीपैकी 77 टक्के शस्त्रास्त्रांची निर्यात केलेली आहे. 2015 मध्ये भारताने 1,941 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची निर्यात केली होती. 2021-22 मध्ये ही निर्यात 11,607 कोटी रुपयांवर पोचली आहे.