संरक्षण : आपले गुप्तहेर खाते प्रबळ व्हावे!

हेमंत महाजन

जागतिक दर्जाच्या गुप्तहेर खात्यांची पद्धत वापरून आपण आपल्या देशापुढील आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. गरज आहे फक्‍त ऍक्‍युरेट किंवा ऍक्‍शनेबल इंटेलिजन्सची.

पेगॅसस या इस्रायलच्या कंपनीने अनेक देशांतील राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे आदी क्षेत्रांतील व्यक्‍तींचे फोन टॅपिंग करून हेरगिरी केली असल्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. याआधी 2019 मध्ये पेगॅसस स्पायवेअर व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या व्यक्‍तींवर पाळत ठेवत असल्याचे चर्चेत आले होते. या स्पायवेअरला इस्रायलमधील कंपनी एनएसओ ग्रुपने तयार केले आहे. 70 देशांतील 51 टक्‍के यूजर्स इंटिलिजन्स एजन्सी, 38 टक्‍के कायदा अंमलबजावणी संस्था आणि 11 टक्‍के सैन्याशी संबंधित या स्पायवेअरचा वापर आहे.

गुप्तचर जगात मोसादचे स्थान 

सर्व गुप्तचर संघटनांमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान मिळवले आहे इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादने. आक्रमक, धूर्त, सगळ्यात मोठं म्हणजे त्यांची वाट्टेल तो धोका पत्करण्याची तयारी, अशी त्यांची प्रतिमा आहे. ट्विन टॉवर पडल्यानंतर सगळ्यात आधी अमेरिकेने बाहेरच्या कोणत्या गुप्तचर संस्थेची मदत घेतली असेल तर ती मोसादची. अमेरिकेने अनेक दहशतवादविरोधी आराखडे जसेच्या तसे मोसादकडून उचलले आहेत.

जानेवारी महिन्यात मोसादने इराणची राजधानी तेहरानमध्ये जाऊन इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पाची माहिती चोरली, एका अणुशास्त्रज्ञाला मारून अणुप्रोग्रॅम दहा वर्षांनी मागे ढकलण्यात आला. या आधी जनरल सुलेमानीला इराणमध्ये मारण्यात आले. 1960 च्या दशकात मोसादने रशियाचे नव कोरं मिग विमान पळवले. मोसादच्या पहिल्या दिवसापासून ते शत्रूच्या हत्या करण्यापासून कधीच कचरले नाहीत. मोसादच्या अधिकाऱ्यांची निवड इस्रायलच्या लष्करामधून करण्यात येते. त्याच्याकडे विशेष गुण असतील तर जनसामान्यांमधूनही खास माणसं शोधून काढली जातात, त्याला गुप्तचर म्हणून वावरण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षणाची पद्धत

इस्रायलमध्ये लष्करी प्रशिक्षण अनिवार्य असल्याने सामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना पाहायला मिळते. अशा नागरिकांशी कोणताही गाजावाजा न करता संपर्क साधला जातो. ज्या नागरिकांची आपल्या देशासाठी स्वत:चं आयुष्य वेचण्याची तयारी असते, त्यांना या क्षेत्रामध्ये प्राधान्य दिलं जातं. त्यांचा बुद्‌ध्यांक सामान्यांपेक्षा जास्त असतो. त्यांना अनेक शारीरिक, वैद्यकीय आणि मानसिक चाचण्यांना तोंड द्यावे लागते. त्यांची मुलाखत मोसादचे सगळ्यात वरिष्ठ अधिकारी घेतात. त्यांना प्रत्येक पातळीवर पारखून घेतले जाते.

या प्रशिक्षणासाठी दोन वर्षांहून अधिक कालावधी लागतो. या कालावधीमध्ये त्यांना गोपनीय संपर्क साधण्याचे तंत्र, तंत्रज्ञानाचा वापर, संवाद साधण्याची कला, इस्रायलसह विविध देशांच्या लष्कराविषयी सखोल माहिती, शस्त्रास्त्रांविषयी माहिती आदी विषयांबद्दल प्रशिक्षण दिले जाते.

जे देश विजयी ठरलेत त्या देशांची राजकीय इच्छाशक्‍ती अतिशय प्रबळ असते. त्यांचे सैन्य शूर आणि सक्षम असते. नागरिक देशभक्‍त असतात. त्या देशांनी योग्य पद्धतीने योजना आखल्या आणि त्यांची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणीही केली. त्यांचे गुप्तहेर खाते सक्षम असते. अर्थात, इस्रायलची गुप्तचर यंत्रणा किती श्रेष्ठ आहे याबद्दल फक्‍त कौतुक करणे हा या लेखाचा उद्देश नाही. इस्रायलच्या कामगिरींमधून भारताला खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यामधून जर आपल्या गुप्तचर यंत्रणांना काही शिकता आले तर आपल्या देशाचे भविष्य अधिक सुरक्षित होऊ शकते.

देशाच्या धोक्‍यासंदर्भात माहिती मिळवणे, त्याचे योग्य विश्‍लेषण करणे हे काम इतके अशक्‍यप्राय आहे का? त्यासाठी आपल्याला काही प्रश्‍नांची उत्तरे मिळवणे आवश्‍यक आहे. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात आपले राजकीय पक्ष कधी गांभीर्याने विचार करणार आहे? एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण त्याविषयी भरपूर माहिती मिळवू शकतो, विश्‍लेषण करतो पण एखादी दुर्घटना, विघातक कृत्य घडू नये म्हणून आधीपासून आपण तयार का नसतो? त्याची गुप्तचर माहिती योग्य ठिकाणी व्यवस्थितपणे का पोहोचत नाही? गुप्तचर यंत्रणेमध्ये भरती करता अजूनही जुन्या पद्धती वापरत आहोत का? गुप्तचर यंत्रणेला मदत म्हणून विविध क्षेत्रांतल्या अन्य व्यक्‍तींचा उपयोग कितपत केला जातो? अपयश झाकण्याकरता या विभागांबद्दलची माहिती बाहेर का येत नाही?

या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे आपण सजगपणे शोधायला हवी, तरच या संपूर्ण यंत्रणेचे डोळे उघडायला मदत होऊ शकते आणि आपल्या देशाला असलेला धोका कमी व्हायलाही!

थेट युद्धभूमीवर शस्त्रं चालवायला सुरुवात करणं म्हणजे युद्ध नव्हे. प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी प्रतिस्पर्धी राष्ट्राची युद्धतयारी, त्यांचं बळ याबरोबरच त्या राष्ट्रातील जनतेची मानसिकता, युद्धाला पाठिंबा देण्याची अथवा न देण्याची तयारी, त्या राष्ट्राच्या नेतृत्वाची मानसिकता, युद्धात कठोर व जलद निर्णय घेण्याची क्षमता आणि धैर्य, आर्थिक ताकद, तसेच या युद्धाप्रती अन्य राष्ट्रांचा कल नेमका कोणत्या बाजूला झुकेल आणि या सगळ्या बरोबरच आपल्या देशातील जनतेची मानसिकता, आपली युद्धक्षमता, आर्थिक ताकद या सगळ्याचा अचूक अंदाज घेणे अत्यावश्‍यक ठरते. या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती त्या देशाच्या हेरखात्यांची!

इस्रायलने वापरलेल्या यशस्वी पद्धतीचा आपण वापर करून आपल्या देशाच्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. आपल्याला गरज आहे ती ऍक्‍युरेट किंवा ऍक्‍शनेबल इंटेलिजन्स. आशा करू की आपल्या गुप्तहेर संस्थांचा येणाऱ्या काळात दर्जा वाढेल आणि देशावर होणारे अनेक धोके, हल्ले रोखण्यात आपल्याला नक्‍कीच यश मिळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.