ज्ञानदीप लावू जगी : पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे ।

हभप प्रशांत महाराज मोरे देहुकर

पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे । एऱ्हवीं तोचि अग्निसंगें सिजे । तरी वेगळा होय ।।65।। तैसें भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगें जीव- । दशे आले ।।66।। म्हणौनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहंममताभ्रांती । विषयांध जाले ।।67।। अध्याय 7 वा

संत ज्ञानेश्‍वर माऊली येथे भगवंत आणि प्राणिमात्र हे अभिन्न आहेत; परंतु भ्रमामुळे वेगळे भासतात या अनुषंगाने आपली भूमिका विशद करतात. मातीचा घट केला आणि त्याच क्षणी त्या कच्च्या घटाला मातीत मिळवले तर तो मातीशी एकरूप होतो. पण तोच घट अग्नीच्या संबंधाने भाजला तर मातीपेक्षा वेगळा होतो. त्याचप्रमाणे सर्व प्राणी खरोखर भगवंताचे अंश आहेत. त्यांची निर्मिती भगवंतापासूनच झाली आहे. परंतु मायेच्या संबंधाने जीवदशेला प्राप्त झाले आहेत.

त्यामुळे भगवंत म्हणतात ते माझेच असून माझ्यापेक्षा वेगळे आहेत. माझेच असूनदेखील मला ओळखत नाहीत. माझे अस्तित्व ते जाणत नाहीत. उलट देहात असलेल्या मीपणामुळे आणि स्त्रीपुत्रादिकांचे ठिकाणी माझ्या पणाच्या भ्रमामुळे आणि विषयामुळे ते डोळे विषयाअंध झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.