हिरोशिमा : रशियाने युक्रेनमधील बाखमत शहर जिंकल्याचा दावा केला आहे. मात्र युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी हा दावा फेटाळला आहे. त्यामुळे रशियाने शनिवारी केलेल्या दाव्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
बाखमत शहरामध्ये युक्रेनचे सैनिक अजूनही रशियाबरोबर लढत असून बाखमत शहर अजूनही युक्रेनचाच भाग आहे, असे झेलेन्सकी यांनी म्हटले आहे. “जी-7′ परिषदेमध्ये उपस्थित असताना पत्रकारांनी बाखमत शहराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना झेलेन्सकी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
बाखमत शहरामध्ये सध्या जोरदार लढाई सुरू आहे. रशिया आणि युक्रेन दोन्ही बाजूंकडून उलट सुलट दावे प्रतिदावे करण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे या दाव्यांमधील तथ्य तपासून पाहणे अशक्य झाले आहे.
“जी-7′ परिषदेमध्ये युक्रेनची बाजू मांडण्यासाठी झेलेन्सकी समक्ष दाखल झाले आहेत. याच दरम्यान बाखमत शहराबाबत रशियाने विजयाचा दावा केला आहे. “सध्या तरी बाखमत आमच्या हृदयामध्ये आहे. ते कोणीही हिरावून घेऊ शकलेले नाही.’ असे झेलेन्सकी म्हणाले. बाखमत शहरातील लढाईत रशियाचे अनेक सैनिक मारले गेले असल्याचेही झेलेन्सकी यांनी म्हटले आहे.