Paris Olympics 2024 (Table Tennis) :- भारताच्या टेबलटेनिस खेळाच्या इतिहासात काल ऐतिहासिक घटना घडली. भारतीय पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघाने इतिहास रचला आणि पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट जिंकले.
जागतिक क्रमवारीच्या आधारे, पुरुष आणि महिला हे दोनही संघ 2024च्या पॅरीस ओलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मार्च महिन्यातील ताज्या सांघिक क्रमवारीनुसार, भारतीय पुरुष संघ जागतिक सांघिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर आणि भारतीय महिलासंघ 13 व्या क्रमांकावर आहे. बुसान येथे झालेल्या आयटीटीएफ ( ITTF ) जागतिक टेबल टेनिस टीम अजिंक्यपद स्पर्धेत, उपांत्यपूर्व फेरीतील सामने गमावल्यानंतरही, पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. मानांकनाच्या आधारे पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
HISTORIC! 🤩
For the first time in Olympic history, Team India will compete in the Table Tennis team events at #Paris2024! 🏓#RoadToParis2024 | #OlympicQualifiers pic.twitter.com/1MN9vkgaD6
— Olympic Khel (@OlympicKhel) March 4, 2024
गेल्या महिन्यात बुसान येथे झालेल्या जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर, ऑलिम्पिकसाठी सांघिक स्पर्धेत सात स्थान शिल्लक होते, जे त्यांच्या जागतिक क्रमवारीच्या आधारावर दिले जाणार होते. भारताशिवाय पोलंड, स्वीडन आणि थायलंडला महिला गटात आणि पुरुष गटात क्रोएशिया आणि स्लोव्हेनियाला पॅरिस तिकीट मिळाले आहे.
जागतिक सांघिक चॅम्पियनशिपच्या अंतिम 16 मध्ये केला होता प्रवेश…
भारतीय टेबल टेनिसच्या इतिहासातील हे महत्त्वाचे यश आहे. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सांघिक स्पर्धेचा समावेश केल्यानंतर भारत टेबल टेनिसमधील सांघिक स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघ ऑलिम्पिक पात्रता जागतिक सांघिक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचले होते. जिथे पुरुष संघाला कोरियाकडून 0-3 आणि महिला संघाला तैवानकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या चॅम्पियनशिपमध्ये अहिका मुखर्जी आणि श्रीजा अकुला यांनी जागतिक क्रमवारीत एक आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या खेळाडूंचा पराभव केला होता.
भारतीय संघाचे हे यश देखील खास आहे कारण संघाला एकही परदेशी प्रशिक्षक नाही. देशाच्याच टेबल टेनिस प्रशिक्षकांच्या बळावर भारतीय संघाने जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.