World 1st Olympic Boxing Qualifying Event in Busto Arsizio, Italy : पाकिस्तानी बॉक्सरचे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. त्याने इटलीतील आपल्या महिला सहकारी खेळाडूच्या पर्समधून पैसे चोरले आणि नंतर तो इटलीमध्ये कुठेतरी फरार झाला. पाकिस्तान हौशी बॉक्सिंग ( Pakistan Amateur Boxing Federation ) महासंघाने मंगळवारी याबाबत खुलासा केला आहे. जोहेब रशीद नावाचा आरोपी बॉक्सर ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेण्यासाठी इटलीला गेला होता.
महासंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी इटलीतील पाकिस्तानी दूतावासाला याची माहिती दिली आहे आणि याप्रकरणी पोलिस रिपोर्टही दाखल केला आहे.
राष्ट्रीय महासंघाचे सचिव कर्नल नसीर अहमद यांनी सांगितले की , ‘जोहेब रशीदची ( Zohaib Rasheed ) ही कृती महासंघ आणि देशासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. तिथल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी झालेल्या पाच सदस्यीय संघाचा तो भाग होता..”
जोहेब रशीदने गेल्या वर्षी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. जोहेब रशीदला पाकिस्तानमध्ये एक उदयोन्मुख खेळाडू मानले जात होते. मात्र आता त्याच्या या कृतीने सर्वांना धक्का बसला आहे.
नासिर यांनी सांगितले की, लॉरा इकराम नावाची महिला बॉक्सर सरावासाठी गेली होती त्यादरम्यान जोहेब रशीदने समोरच्या डेस्कवरून रूमची चावी काढून पर्समधून विदेशी चलन चोरले. यानंतर तो हॉटेलमधून गायब झाला.
नासिर यांनी सांगितले की, ‘पोलिसांना याबाबत कळवण्यात आले असून झोहेबचा शोध सुरू आहे, मात्र तो कोणाच्याही संपर्कात नाही.’ दरम्यान, पाकिस्तानी खेळाडू परदेशात जाऊन गायब होण्याची ही पहिलीच वेळ नाही.