पटियाला – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टर अचिंत शिउली शुक्रवारी रात्री एनआयएस पटियाला येथील महिला वसतिगृहात प्रवेश करताना पकडला गेला. त्यानंतर त्याला पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आयोजित शिबिरातून बाहेर काढण्यात आले आहे. (Weightlifter Achinta Sheuli Expelled From Paris Olympics 2024 Preparatory Camp, Here’s Why)
पुरुषांच्या ७३ किलो गटात प्रवेश करणाऱ्या 22 वर्षीय अचिंतला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले आणि त्याचा व्हिडिओही बनवला. भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकारची गैरवर्तवणुक कधीही खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे अचिंतला तातडीने छावणी सोडण्यास सांगण्यात आले आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि एनआयएस पटियालाचे कार्यकारी संचालक विनीत कुमार यांना घडलेल्या प्रकाराची माहिती तात्काळ देण्यात आली. व्हिडिओ पुराव्यामुळे, साईने तपास समिती स्थापन केली नाही. व त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये अचिंतने नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.
पटियाला येथे मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. सध्या महिला बॉक्सर, खेळाडू आणि कुस्तीपटू एनआयएस पटियालामध्ये आहेत. वेटलिफ्टिंग महासंघाने यापूर्वी कॉमनवेल्थ आणि युवा ऑलिम्पिक चॅम्पियन जेरेमी लालरिनुगा याला गैरवर्तन केल्याबद्दल राष्ट्रीय शिबिरातून काढून टाकले होते.
ऑलिम्पिकच्या आशा संपल्या आहेत
यासह, पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेसाठी अनिवार्य असलेली या महिन्यात थायलंडमधील फुकेत येथे होणारी आयडब्ल्यूएफ विश्वकरंडक स्पर्धा अचिंत खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत.
तो सध्या ऑलिम्पिक पात्रता शर्यतीत 27 व्या क्रमांकावर आहे आणि उपखंडीय कोट्यातून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याची संधी त्याला होती. आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती मीराबाई चानू (49 किलो) आणि राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक विजेती बिंदियाराणी देवी पॅरिस ऑलिम्पिकच्या शर्यतीत आहेत. दोघेही फुकेत येथे ही स्पर्धा खेळणार आहेत.