मुंबई – रुग्णालयाचे दैनंदिन कामकाज चालू ठेवण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या आणि करोनाच्या विरोधात लढा देणाऱ्या परिचारिका या आरोग्यव्यवस्थेचा केंद्रबिंदू असतात. अगदी गंभीर रुग्णांपासून ते प्रकृती सुधारत असलेल्या आणि विशेष वैद्यकीय सेवेची गरज असलेल्या रुग्णांसाठी काम करणाऱ्या परिचारिकांचा देशात लवकरच तुटवडा जाणवू लागण्याची चिन्हे आहेत.
भारतापेक्षा अन्य देशांमध्ये विशेषतः आखातातील देश, ब्रिटन आणि आयर्लंड या देशांमध्ये भारतीय परिचारिकांना मोठी मागणी आहे. या देशांमध्ये परिचारिकांना मिळणारे चांगले वेतन तसेच कामासाठीचे चांगले वातावरण यामुळे तिकडच्या नोकरीची ओढ वाटणे स्वाभाविक ठरू लागले आहे. करोनाच्या साथीचा मुकाबला करत असताना या देशांनी आरोग्यव्यवस्था बळकट करण्यावर भर देताना परिचारिकांची भरती करण्याचे धोरण ठेवल्याने परिचारिकांना मोठी मागणी आहे.
मागील आठवड्यात सुमारे 500 परिचारिका नोकरीच्या निमित्ताने ब्रिटनला रवाना झाल्याची माहिती युनायटेड नर्सेस असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा जिबिन टीसी यांनी दिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही भारतीय परिचारिकांना मागणी आहे. भारतात येत्या तीन ते सहा महिन्यांमध्ये 30 हजार परिचारिकांची गरज भासणार आहे तसेच आगामी चार वर्षात सुमारे वीस लाख परिचारिका लागतील.
भारतात काही मोठ्या रुग्णालयांचा अपवाद सोडला तर अन्य खासगी रुग्णालयांमध्ये वेतन आयोगाने शिफारस केल्यापेक्षा कितीतरी कमी वेतन दिले जाते. त्यामुळेच भारतातील प्रशिक्षित आणि कुशल परिचारिकांना नेण्यासाठी आशियातील अनेक देशांनी खास विमाने पाठवण्याची तयारी केली आहे. भारतीय परिचारिकांना संधी देण्यासाठी ब्रिटनने पात्रता निकष कमी केले आहेत.
युरोपात परिचारिकांच्या वेतनाची सुरवात वार्षिक 16 ते 22 लाख रुपयांनी होते. त्याशिवाय नोकरीतील आणखी फायदे त्यांना लागू असतात. भारतात शासकीय सेवेत असणाऱ्या परिचारिकांना सातव्या वेतन आयोगानुसार महिन्याला 50,000 रु. ते 70,000 रु. वेतन मिळते. तर मोठ्या खासगी रुग्णालयांमधील परिचारिकांच्या वेतनाची सुरवात रू. 15,000 ते 20,000 पासून होते.