सातारा -सातारा नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वतंत्र पॅनेल निश्चितपणे असणार आहे, असे आमदार शिशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बॅंक राजकारणविरहित ठेवण्यासाठी सर्वांचाच प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
सातारा पालिकेचे राजकारण नेहमीच चर्चेचे राहिले आहे. श्री. शिंदे यांच्या माहितीमुळे पुढील निवडणुकीची रंगत आतापासूनच वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र पॅनेल टाकणार का, असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, “सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वतंत्र पॅनेल निश्चितपणे टाकणार आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला पालिकेच्या निवडणुकीत राबवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन झाला तर तसाही निर्णय घेण्यात येईल. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक राजकारणविरहित ठेवण्याचा सर्वांचाच प्रयत्न आहे.
आगामी निवडणुकीत तसा प्रयत्न राहू शकतो. जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच वर्चस्व आहे. मात्र, सहकारात राजकारण येऊ नये, अशी आमची कायमच भूमिका असल्याचे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले. सातारा पालिकेची गेल्यावेळची निवडणूक खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील आघाड्यांमध्ये झाली होती. त्यात उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आली. तर शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडी व भाजप सदस्यांना विरोधात बसावे लागले.
या निवडणुकीवेळी हे दोन्ही नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. विधानसभा निवडणुकीच्यावेळी दोन्ही नेते भाजपमध्ये गेले. त्यामुळे पालिकेवर सध्या भाजपचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. त्यापार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच शहरालगतचा शाहूपुरी, शाहूनगर व इतर ग्रामीण भागाचा समावेश पालिका हद्दीत झाला आहे. त्यामुळे दोन्ही राजेगटांच्या राजकारणाला शह देण्याचे प्रयत्न होणार आहेत.