IND vs SA Test Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऋतुराजच्या जागी टीम इंडियामध्ये अभिमन्यू ईश्वरनची निवड केली आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये अभिमन्यूचा रेकॉर्ड चांगला आहे. तो सध्या भारत अ संघाचा भाग आहे आणि मुख्य संघासोबत दक्षिण आफ्रिकेत आहे. तर दुसरीकडे बीसीसीआयने रिंकू सिंगचा भारत ‘अ’ संघात समावेश केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान ऋतुराजला दुखापत झाली होती. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. ऋतुराजच्या जागी अभिमन्यूला स्थान मिळाले आहे. शुक्रवारी संध्याकाळीच त्याच्याबाबत अपडेट प्राप्त झाले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाइटद्वारे टीम इंडियाबाबत अपडेट जारी केले आहे.
बीसीसीआयने भारत ‘अ’ संघात रिंकू सिंग, सर्फराज खान, रजत पाटीदार आणि आवेश खान यांचा समावेश केला आहे. या खेळाडूंचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. रिंकू टीम इंडियाकडून टी-20 आणि वनडे खेळला आहे. पण कसोटीमध्ये त्याला संधी मिळाली नाही. मात्र, आता भारत अ संघाच्या चार दिवसीय सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. अभिमन्यू ईश्वरनकडे भारत ‘अ’ संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. त्याच्यासोबत साई सुदर्शन आणि आकाश दीप यांचाही संघात समावेश आहे. कुलदीप यादवला संघातून रिलीज करण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ ( IND A vs SA A) : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सर्फराज खान, टिळक वर्मा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, नवदीप सैनी. , आकाश दीप , विदथ कावरप्पा , मानव सुथार , रिंकू सिंग.