IND vs ENG 5th Test Day 2 : भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच 3-1 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव सुरू आहे. आज कसोटीचा दुसरा दिवस आहे.
IND vs ENG Live : भारतला पाचवा धक्का….
भारताला 403 धावांवर पाचवा धक्का बसला आहे. देवदत्त पडिक्कल 103 चेंडूत 65 धावा करून बाद झाला. त्याला शोएब बशीरने क्लीन बोल्ड केले. पडिक्कलने आपल्या खेळीत 10 चौकार आणि एक षटकार लगावला. सध्या रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल क्रीजवर आहेत.
पडिक्कलने पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली. त्याने सर्फराज खानसोबत 97 धावांची भागीदारी केली होती. सर्फराज 56 धावा करून बाद झाला. चहापानानंतर जो रूटकरवी त्याला शोएब बशीरने झेलबाद केले. भारताची आघाडी सध्या 187 धावांची आहे.
सलग दोन षटकांत भारताला दोन मोठे धक्के…
त्यापूर्वी, सलग दोन षटकांत भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. डावाच्या 62 व्या षटकात बेन स्टोक्सने मालिकेतील पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. रोहितने 162 चेंडूत 103 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 13 चौकार आणि तीन षटकार मारले. रोहित आणि शुभमनमध्ये 171 धावांची भागीदारी झाली. यानंतर 63व्या षटकात जेम्स अँडरसनने शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. शुभमनने 150 चेंडूत 110 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 12 चौकार आणि पाच षटकार मारले. रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील 12वे शतक झळकावले तर शुभमन गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले.
पहिल्या दिवशी काय झालं….
दरम्यान, पहिल्या दिवशी कुलदीप यादव व रवीचंद्रन अश्विन यांची भेदक गोलंदाजी व यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहितची नाबाद अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर यजमान टीम इंडियानं इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात 1 गडी गमावून 135 धावापर्यंत मजल मारली होती. इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या . यानुसार भारत अजूनही इंग्लंडपेक्षा 83 धावांनी मागे होता. कर्णधार रोहित शर्मा 52 (83 चेंडू,6 चौकार, 2 षटकार) धावांवर नाबाद असून शुभमन गिल 26 धावांवर (39 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार) नाबाद परतले होते. दोघांमध्ये 31 धावांची भागीदारी झाली.
भारतीय संघाला एकमेव धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला. 58 चेंडूत 57 धावा करून तो बाद झाला. शोएब बशीरने त्याला यष्टिरक्षक बेन फॉक्सकरवी यष्टिचित केले. यशस्वीने 57 धावांच्या खेळीत 5 चौकार व 3 षटकार लगावले. त्याने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. यशस्वीचे कसोटी कारकिर्दीतील हे चौथे अर्धशतक होते. त्याचवेळी, रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे 18 वे अर्धशतक ठरले.
त्याआधी, इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला. कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने 100 वी कसोटी खेळत चार विकेट घेतल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 79 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. म्हणजे इंग्लंडच्या सर्व 10 विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या.