तळेगाव दाभाडे – अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत रविवारी (दि.6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तळेगाव रेल्वे स्टेशन सह 508 रेल्वे स्थानकांच्या नुतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी ऑनलाईनच्या माध्यमातून या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ऑनलाईनच्याच माध्यमातून लोकांशी संवाद साधला.
पहिल्या टप्प्यामध्ये मावळ मतदार संघातील तळेगाव स्टेशनचा विकास केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये चिंचवड व देहूरोड या रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. मतदार संघातील आठ व्हेईकल अंडरपास कामांची मंजुरी घेऊन काम झाली आहेत. लोणावळा शहरामध्ये दोन ओव्हर ब्रिजची कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
मावळवासीयांच्या वतीने लोणावळा ते पुणे रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात. त्याचबरोबर दौंड, पुणे, इंदोर व पुणे ते जयपूर याठिकाणी जाणाऱ्या गाड्यांना तळेगाव स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केली. दरम्यान स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभुळकर व अन्य तीन स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय मुलांच्या स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला डी. आर. एम. इंदू, दुबे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, रघुवीर शेलार, ऍड. रवींद्र दाभाडे, सुनील मोरे, प्रशांत ढोरे, सत्यशीलराजे दाभाडे, उमाकांत कुलकर्णी, रवींद्र माने, अनंता कुडे, बाळासाहेब शेलार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार डीसीएम डॉ. मिलिंद हिरवे यांनी केले. सूत्रसंचालन राजकुमार साळवी यांनी केले.