पुणे – महिलांनी अगदी उपग्रह मोहिमेत सहभागी होण्यापासून अंतराळ भरारी मारण्यापासून ते विमानाचे पायलट होऊन आकाशाला गवसणी घातली आहेच. आता मोठ्या शहरात महाजाळे होऊ पाहणाऱ्या “मेट्रो’चे सारथ्यही महिलांच्या हाती देण्यात आले आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात वनाझ येथील मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले. त्यादिवशी मेट्रोचे सारथ्य अपूर्वा अलाटकर या युवतीने केले होते. अपूर्वा ही सातारची कन्या आहे.
पोलीस, सैन्य दलात जसे सातारच्या सुपुत्रांनी बाजी मारली तशी आता येथील महिलांनीही आता जगाच्या कॅनव्हासवर आपले वेगळेपण दाखवले आहे. “वंदे भारत’ ही रेल्वे चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायलट सुरेखा यादव या देखील सातार कन्याच आहेत. त्यानंतर आता अपूर्वा ही मेट्रो चालवणारी पहिली महिला ठरली आहे. अपूर्वा हिने पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखवल्यावर मेट्रोच्या “मास्क ऑन की’च्या साथीने मेट्रो रूबी हॉल क्लिनिक थांब्याच्या दिशेने नेली. तांत्रिक बाबींचे पालन करत तिने हा प्रवास पूर्ण केला.
साताऱ्यातील शाहूपुरीत राहणाऱ्या प्रमोद आणि उज्ज्वला अलाटकर यांची अपूर्वा ही कन्या. तिचे शालेय शिक्षण साताऱ्यात झाले. दहावीनंतर मेकॅनिकलचा डिप्लोमा करण्यासाठी तिने सोलापूरच्या तंत्रशिक्षण महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथील शिक्षण पूर्ण करून, इंजिनीअरिंगचे पदवीचे शिक्षण घेण्यासाठी तिने सज्जनगड येथील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. ते पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील कल्याणी उद्योग समूहात तिला नोकरीची संधी मिळाली. परंतु, करोनामुळे ती पुन्हा साताऱ्यात आली.
लॉकडाऊन उठल्यानंतर आणि सगळी जगरहाटी सुरळीत झाल्यानंतर मेट्रोसाठी पदभरतीची माहिती तिला 2019 मिळाली आणि तिने अर्ज केला. तिला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. सर्व काठिण्य पातळ्या पूर्ण करून 2023 मध्ये तिच्या नियुक्तीवर “महामेट्रो’ने मोहोर उमटवली. तिच्याकडे वनाझ स्थानकाच्या “स्टेशन कंट्रोलर’ आणि “ट्रेन ऑपरेटर’ अशी दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली. एवढेच नव्हे तर उद्घाटनाच्या पथकात तिचा समावेश करण्यात आला आणि 45 दिवसांचे कठोर प्रशिक्षण तिने पूर्ण केले.
मेट्रोच्या या विशेष प्रशिक्षणामध्ये व्यायामासह अनेक आव्हानात्मक गोष्टी होत्या. त्यामध्ये आपत्कालिन प्रशिक्षणाचाही समावेश आहे. हे सगळे प्रशिक्षण माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. त्यानंतर जेव्हा लोकोपायलट म्हणून मेट्रोचे चलनवलन सुरू झाले आणि घरच्यांचा पाठिंबा, प्रवाशांचेही प्रेम मला मिळाले. – अपूर्वा अलाटकर, लोको पायलट, महामेट्रो