मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नव्या भारताचे महात्मा असा केला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांच्यावर टीकाही झाली. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्या त्या विधानावरून सवाल उपस्थित केले आहेत. नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे अमृता फडणवीस यांनी जाहीर केले. नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतला होता?” असा सवाल सामनाच्या रोखठोकमधून विचारण्यात आला आहे.
“स्वातंत्र्यासाठी मेले कोण व स्वातंत्र्याची फळे चाखतंय कोण? असे प्रश्न नेहमीच उपस्थित केले जातात. आज सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य तरी राहिले काय? काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी जळजळीत वास्तव मांडले. ‘‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी कुटुंबाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मात्र स्वातंत्र्यासाठी तुमचा कुत्राही मेला नाही.’’ खरगे यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्ष संतापला आहे”. असं स्पष्ट मत रोखठोकमध्ये मांडण्यात आलं आहे.
“सौ. फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात व एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सौ. फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय? पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रत्येक भारतीयास आदर असायला हवा, पण महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी देशाच्या जनतेने दिली” असल्याचे देखील संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये नमूद केले आहे.
“काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या लढय़ाची ठिणगी टाकली. टिळकांपासून गांधींपर्यंत, नेहरूंपासून सरदार पटेल, सुभाषचंद्र बोसपर्यंत प्रत्येकाने त्यात आयुष्याच्या समिधा टाकल्या. या स्वातंत्र लढय़ाच्या इतिहासात भाजप-संघ वगैरेंचे कोठे नामोनिशाण आहे काय? श्री. खरगे म्हणतात, निदान स्वातंत्र्य लढय़ातील तुमचा कुत्रा तरी दाखवा” असंही रोखठोकमध्ये म्हंटल आहे.
“खरगे यांचे कुत्र्यासंबंधीचे विधान भाजपला त्यासाठी झोंबले. स्वतःचा इतिहास नसला की दुसऱ्यांचा इतिहास नष्ट करण्याची धडपड सुरू होते. हा एक प्रकारचा न्यूनगंडच असतो. ज्या काळात, ज्या लढय़ात आपण कधीच नव्हतो तो काळ पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वातंत्र्य लढय़ाची प्रतीके व प्रतिमा उद्ध्वस्त होताना दिसत आहे. नवे राष्ट्रपिता, नवे सरदार, नवे पंडित, नवे मौलाना, नवे नेताजी, नवे हिंदुहृदयसम्राट, नवी शिवसेना, नवी काँग्रेस निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे. हे सर्व का व कशासाठी?” असा जळजळीत सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
“राष्ट्रपिता महात्मा गांधी निर्भय होते. मग नव्या भारताच्या नव्या राष्ट्रपित्यांना विरोधकांचे भय का वाटावे? याचे कारण एकच, स्वातंत्र्यासाठी एकही लाठी न खाणाऱ्यांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. त्यांना लढणाऱ्यांचे व सत्य बोलणाऱ्यांचे भय वाटते. हे किती काळ चालायचे?” अस सडेतोड मत रोखठोकमध्ये व्यक्त करण्यात आले आहे.