नवी दिल्ली – शेजारच्या चीनमध्ये करोनाचा जो नवा अवतार अर्थात व्हेरियंट आढळला आहे, त्यामुळे जगात आणि भारतातही काहीसे काळजीचे वातावरण आहे. हा व्हेरियंट किती धोकादायक असेल याचा विचार आणि तपासणी केली जाते आहे. सध्या चीनमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे. चीनमध्ये या 20 दिवसांमध्ये 24 कोटी 80 लाख लोकांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर ख्रिसमसच्या काळातही लोकांना घरी थांबण्याचे आवाहन केले जात आहे.
दरम्यान, चीनच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, काही ठिकाणी मृदतेह ठेवण्यासाठी जागा सुद्धा शिल्लक नसल्याचं सांगण्यात येत आहे. नागरिकांना मृतदेहवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 24 तास वाट पहावी लागत आहे. इतकी भीषण परिस्थिती सध्या चीनमध्ये सुरु आहे.
चीनमधील सरकारी कागदपत्रे लीक झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. नवीन व्हेरियंटने सध्या संपूर्ण जगाला धडकी भरवली असून, भारतात देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुन्हा एकदा मास्कचा वापर करण्यास सांगितलं आहे.