पुणे – गेल्या 15 फेब्रुवारीपासून रोजची करोना बाधितांची वाढती आकडेवारी पाहता गेल्या तीन दिवसांपासून बाधितांचा “ग्रोथ रेट’ 20 ते 22 टक्के दिसून येत आहे. हा आलेख असाच वाढत राहिला तर तो 30 टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या 25 ते 30 दिवसांपासून बाधितांची संख्या वाढतच चालली असून, ती आता दीड हजारांच्या घरात गेली आहे. संशयितांच्या स्वॅब टेस्टही वाढून सात-साडेसात हजारापर्यंत गेल्या आहेत. टेस्ट आणि बाधित असे प्रमाण पाहिल्यास बाधितांचा “ग्रोथ रेट’ 20 ते 22 टक्क्यांपर्यंत वर गेलेला दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बाधितांचाही ग्रोथ रेट सुमारे 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून दोन अडीच हजार चाचण्यांमागे बाधितांची संख्या चारशेच्या घरात आढळून येत आहे.
दरम्यान, नोकरी किंवा अन्य देश-राज्यांत जाण्यासाठी आवश्यक म्हणून टेस्ट करणाऱ्यांचे प्रमाणही रोजचे दोन-अडीच हजार आहे. त्यामुळे “आरटी-पीसीआर’ टेस्टची संख्याही यामध्ये जास्त दिसते. काही कंपन्यांनी “आरटी-पीसीआर’ टेस्ट ठराविक कालावधीनंतर “कम्पलसरी’ केल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची गर्दी होत आहे. परदेशी जाण्यासाठी टेस्ट आवश्यक असल्याने त्या टेस्ट करून घेणाऱ्यांची संख्याही यामध्ये दिसून येते.
कर्नाटक आणि अन्य काही राज्यांमध्ये जाण्यासाठीही “आरटी-पीसीआर’ टेस्टही आवश्यक असल्याने ती करून घेणाऱ्यांचेही प्रमाण यामध्ये आहे. त्यामुळे एकूण टेस्ट अशा सात हजारांपर्यंत जात आहेत. या चाचण्यांचा समावेश करून “ग्रोथ रेट’ काढल्यास तो 17 टक्के होतो. मात्र, प्रत्यक्षात तो 20-22 टक्क्यांच्या जवळपास आहे, असे मनपाचे सहायक आरोग्य प्रमुख असे डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.