पिंपरी – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सुमारे 400 कोटींहून अधिक खर्च करून कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ते सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच कमांड अँड कंट्रोल सेंटरवर सायबर हल्ला झाला आहे. हा प्रकार स्मार्ट सिटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत निगडी येथील व्यापारी संकुलात मेसर्स टेक महिंद्रा लिमिटेड व त्यांचे भागीदार पार्टनर यांचे मार्फत कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटरचे कामकाज सुरू आहे. सुमारे 441 कोटी रुपयांचा खर्च या कामावर होत आहे. त्याअंतर्गंत स्मार्ट पार्किंग, सिटी सर्व्हलन्स, सिटी नेटवर्क, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सिवरेज, स्मार्ट ट्रॅफिक अशी कामे केली जात आहेत.
यामध्ये संपूर्ण शहर, यंत्रणा आणि दळवळणावर देखरेख व नियंत्रणाची व्यवस्था असणार आहे. यात करप्रणालीशी निगडीत अनेक बाबींचा समावेश आहे. त्यापूर्वीच हा सायबर हल्ला झाल्याने स्मार्ट सिटी व महिंद्रा टेक या कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. बड्या कंपन्यांना काम देऊनही सायबर हल्ले होत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले की, सायबर हल्यामुळे 27 सर्व्हरमधील सर्व डेटा इन्फेक्टेड झालेला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कामकाज हे प्राथमिक स्वरूपात सुरू होते. आता सर्व 27 सर्व्हर परत सुरू करणे, त्यासाठी आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरीग पुणे यांच्याकडून तपासणी झाल्यानंतर पुढील कामकाज केले जाईल. सायबर हल्ल्याची तज्ज्ञामार्फत स्मार्ट सिटी कंपनी देखील चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.