कोणाला होतो स्तनाचा कर्करोग?

भारतातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. महिलांमध्ये उद्‌भवणाऱ्या कर्करोगामध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण 32 टक्के इतके असून, दर 25 ते 30 महिलांमध्ये एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्‍यता असते. या आजाराविषयी महत्त्वपूर्ण माहिती…

कोणाला होतो स्तनाचा कर्करोग?
स्तनाचा कर्करोग हा म्हटलं तर कोणालाही होऊ शकतो. सहसा चाळीशी – पन्नाशीच्या वयोगटात सर्वाधिक केसेस आढळतात. परंतु वयाच्या विशी-तिशीमध्ये सुद्धा कर्करोग होतो, हे अनेकांना माहीत नसतं. गरोदर अवस्थेत आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसुद्धा हा आजार होऊ शकतो. उतार वयात 70-80 वयाच्या महिलांना देखील होतो. एवढच काय तर, पुरुषांना सुद्धा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. बहुतेक रुग्णांना कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री नसते, त्यामुळे आपल्या नात्यात कोणाला नाही म्हणून आपण सुखरूप आहोत अशा भ्रमात राहू नये.

जवळच्या नातलगांना (आई, बहीण, आज्जी, मावशी, आत्या) स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर हा आजार होण्याची शक्‍यता वाढते. ज्या स्त्रियांना वयाच्या 12 व्या वर्षांआधी मासिक पाळी सुरू होते व ज्या स्त्रियांना रजोनिवृत्ती (मासिक पाळी बंद होणे) वयाच्या 55 व्या वर्षांपर्यंत होत नाही, त्यांच्यात कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते. तसेच ज्या स्त्रियांना तिशीपर्यंत एकही मूल झाले नाही, किंवा ज्यांनी स्तनपान केले नाही, अशा स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते.

कर्करोगाची काय लक्षणं असतात?
स्तनामध्ये गाठ किंवा दाटी, निप्पल मधून असामान्य स्त्राव, स्तनाच्या त्वचेमधे लाली किंवा खडबडीतपणा, स्तनाच्या आकारात बदल, निप्पलचा भाग आत खचणे, काखेमध्ये गाठ होणे ही सर्व कर्करोगाची लक्षणे असू शकतात. कर्करोगाच्या गाठीमुळे सहसा वेदना होत नाहीत. प्राथमिक अवस्थेत शरीरावर इतर काही परिणाम देखील होत नाहीत. त्यामुळे काही त्रास होत नाहीये म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष होतं आणि वेळेवर निदान करण्याची संधी हरवते. कितीही क्षुल्लक वाटणारं लक्षण जाणवलं तरीही स्तनरोग विषयात तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्‍टरना भेटा आणि त्यांच्या सल्ल्‌याने योग्य त्या तपासण्या करा.

स्तनाच्या नियमित कोणत्या चाचण्या कराव्या?
20 वर्षांपासूनच महिन्यातून एकदा स्वतःचे स्तनपरीक्षण करा (सेल्फ ब्रेस्ट एक्‍झाम)
30 वर्षांपासून डॉक्‍टरांकडून स्तनाची तपासणी करवून घ्या (क्‍लिनिकल ब्रेस्ट एक्‍झाम)
40 वर्षांपासून अनुभवी केंद्रात जाऊन मॅमोग्राफीची वार्षिक तपासणी करा.
मॅमोग्रॅम म्हणजे काय आणि त्यासाठी काय तयारी करावी लागते?
मॅमोग्राम हा स्तनाचा काढलेला विशेष प्रकारचा एक्‍स-रे असतो. ही तपासणी मॅमोग्राफी सेंटरमध्ये खास उपकरणे वापरून केली जाते. अगदी सूक्ष्म, कमी प्रमाणात रेडिएशन वापरून प्रत्येक स्तनाचे दोन एक्‍स-रे काढण्यात येतात. रेडिओलॉजिस्ट या चित्रांचा अभ्यास करुन रिपोर्ट तयार करतात. एक्‍स-रे घेताना स्तनाचा भाग 5-10 सेकंद प्लेट्‌सच्या मध्ये धरला जातो.

यामुळे स्तनावर दाब जाणवतो. अनुभवी टेक्‍निशियन आणि आधुनिक उपकरणे असल्यास तपासणी अगदी सोईस्कर होऊ शकते. यासाठी कॉन्ट्रास्ट किंवा आयव्हीची गरज नसते. सकाळी अंघोळ केल्यावर डिओडंट पावडर किंवा क्रीम इत्यादी न लावता तपासणीसाठी जावे. या तपासणीसाठी उपाशी राहण्याची गरज नाही. आतापर्यंत केलेल्या सर्व मॅमोग्राफी व सोनोग्राफीचे रिपोर्ट बरोबर ठेवा. नवीन तपासणीची तुलना, आधीच्या फिल्म्सशी करणे महत्त्वाचे असते. आधीचे बायोप्सी अथवा सर्जरीचे रिपोर्टदेखील बरोबर ठेवावे.

स्तनाची काही तक्रार नसेल तर मॅमोग्राफी का करावी?
स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग असल्याने, 40 वर्षांपुढील प्रत्येक स्त्रीने वार्षिक ही तपासणी करावी असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. नियमित तपासणी करणाऱ्या महिलांमध्ये स्तनकर्करोगाचे निदान, गाठ हाताला लागण्या अगोदर होऊ शकते. प्राथमिक अवस्थेत उपचार झाल्यास उपचार सोईस्कर होतात आणि जिवाला धोका टळतो. सशक्त स्त्रियांमध्ये या हेतूने केलेल्या तपासणीला स्क्रिनिंग मॅमोग्राफी
म्हटले जाते.

सोनोग्राफी कधी करावी?
40 वर्षाखालील वयाच्या स्त्रियांसाठी तक्रारीच्या निदानासाठी, अगोदर स्तनाची सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड तपासणी केली जाते. सोनोग्राफीमध्ये एक्‍स-रे न वापरता, ध्वनी लाहिरींचं वापर होतो. वय वर्ष 40 पेक्षा अधिक असल्यास, आधी मॅमोग्राफी आणि त्यानंतर आवश्‍यक असल्यास सोनोग्राफी केली जाते. दोन्ही तपासण्या एकमेकांना सहाय्यक असून, अनेक वेळा पूर्ण निदान करण्यासाठी दोन्ही साधनांचा वापर केला जातो. मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफीच्या तपासणीनंतर काढल्या गेलेल्या निष्कर्षांत 10 ते 15 टक्के चूक होऊ शकते. म्हणूनच मॅमोग्राफी व स्तनांची तज्ज्ञांद्वारे तपासणी यांची जोड असणे महत्वाचे आहे.

अचूक निदान होण्यासाठी काय करावे?
स्वतः चे निदान स्वतः करायला जाऊ नका, स्तनरोग विषयात तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्‍टरांना भेटा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्‌याने योग्य त्या तपासण्या करा. निदानाची क्रिया किचकट असू शकते त्यामुळे खात्रीपूर्वक निदान होईपर्यंत धीर धरा. स्तनात गाठ असेल तर अचूक निदानासाठी गाठीची तिहेरी चाचणी झाली पाहिजे.

यात डॉक्‍टरांनी केलेले परीक्षण, महिलेच्या वयानुसार उचित असलेल्या मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफीसारख्या रेडिओलॉजीच्या तपासण्या आणि शेवटी सुईची तपासणी किंवा बायोप्सी, असे तीन घटक असतात. सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाने बायोप्सी केली, तर योग्य जागेतून सॅम्पल घेण्याची अचूकता वाढते. योग्य चाचण्यांच्या अभावी बांधलेले अंदाज, धोकादायक ठरू शकतात.

कर्करोगाची शक्‍यता कमी कशी कराल?
या आजारापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करा. व्यायामामुळे या आजाराची शक्‍यता 20-30% कमी होते. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. मेनोपॉझनंतर हॉर्मोन्सची औषधे टाळा; वजनावर नियंत्रण ठेवा. आहारात फळं-भाज्या,कडधान्य जास्त, व तेल-तूप कमी ठेवा.

या सर्व गोष्टी सांगण्याचे कारण असे की स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी अजून काही निवारक लस उपलब्ध नाही. परंतु प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. यामुळे महिलांनी आपल्या शरिराविषयी जागरूक राहावं, डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली स्तनाच्या नियमित तपासण्या कराव्यात आणि स्तनामध्ये जाणवलेल्या अनियमित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला देणे योग्य वाटते.

 

  • डॉ. प्रांजली गाडगीळ

 

Leave A Reply

Your email address will not be published.