पुणे – शहरात सलग दुसऱ्या दिवशीही आणखी 7 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे सातही मृत्यू अवघ्या 12 तासांत झाले. त्यामुळे जिल्ह्यात मृतांची संख्या 133 वर जाऊन पोहोचली. दरम्यान, गेल्या 24 तासांत नव्याने 117 करोनाबाधित रूग्ण सापडले असून, बाधितांची एकूण संख्या 2 हजार 146 वर पोहोचली आहे.
शहरात करोनामुळे मृत्यूचा कहर सुरूच आहे. गुरुवारी दिवसभरात केईएम रुग्णालयातील 3 करोना बाधितांचा मृत्यू झाला. तर ससून, नवले, डेक्कन येथील सह्याद्री आणि नोबेल हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 1 असे 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
भवानी पेठेतील 65 आणि 66 वय असलेल्या दोघांना केईएम रुग्णालयात दाखल केले होते. तर कोंढवा बुद्रुक येथील 69 वर्षीय व्यक्तीला 27 एप्रिल रोजी केईएममध्ये दाखल केले. मात्र, या तिघांचा गुरुवारी मृत्यू झाला. ससून रुग्णालयात 3 मे रोजी गंजपेठेतील 72 वर्षीय व्यक्तीला दाखल केले. तर येरवडा येथील 70 वर्षीय व्यक्तीला नोबेल रुग्णालयात दाखल केले होते. येरवडा येथील 75 वर्षीय व्यक्तीला काशीबाई नवले आणि डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गंजपेठेतील 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला.
आणखी 84 जण करोनामुक्त
करोनाच्या आजारातून बरे झालेल्या व्यक्तीची संख्याही वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल 84 जणांना घरी सोडले असून, आतापर्यंत 671 जणांना घरी सोडले आहे.