नवी दिल्ली: हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील शहरांबाबतचा हवामान अंदाज दिला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “आयएमडी’ने 5 मेपासून पाक व्याप्त काश्मीरचा भाग असलेल्या जम्मू-काश्मीर हवामान उपविभागांतर्गत गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फरबाद या शहरांचा समावेश केला आहे. याअंतर्गत वायव्येकडील हवामान विभागांबाबतच्या हवामान अंदाज दिला जातो, असे या उपविभागाच्या प्रादेशिक हवामान खात्याचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले.
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरचे विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आला आहे. तेंव्हापासूनच या शहरांसाठीचा हवामान अंदाज दिला जात आहे, असे भारतीय हवामान संस्थेचे महासंचालक एम मोहापात्रा यांनी सांगितले. मात्र, जम्मू-काश्मीर उपविभागांतर्गत आता त्याचा स्पष्ट उल्लेख केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. “पीओके’तील या शहरांना आता वायव्य विभागाच्या एकूणच अंदाजात एक जागा मिळाली आहे.
वायव्य विभागात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली-चंडीगड-हरियाणा, पंजाब, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थान असे नऊ उपविभाग आहेत.