पिंपरी, दि. 17 (प्रतिनिधी) – सारथीवरील समस्या सुटाव्यात, यासाठी पॉइन्टद्वारे मूल्यमापन करण्यास माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर आलेल्या आयुक्तांनी पॉइंटद्वारे मूल्यमापनाकडे दुर्लक्ष केले. कोणाकडूनच विचारणा होत नसल्याने महापालिका अधिकाऱ्यांना धाक राहिलेला नाही. यामुळे सारथीवरील नागरिकांच्या समस्या काही सुटताना दिसत नाही.
नगरसेवकांशिवाय नागरिकांना आपल्या समस्या मांडता याव्यात यासाठी माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 15 ऑगस्ट 2013 रोजी सारथी ही हेल्पलाइन सुरू केली. या हेल्पलाइनवरून महापालिकेच्या विविध विभागांची माहितीही देण्यात येत होती. ज्या विभागाची तक्रारी आहे त्या विभागाच्या प्रमुखाने ते काम आपल्या हाताखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करून घेण्याची जबाबदारी होती. आलेल्या तक्रारीची पूर्तता न झाल्यास संबंधित विभागाचे पॉइन्टद्वारे मूल्यमापन केले जात होते. 7-15 दिवसांत एक पॉईन्ट, 15-21 दिवसांत दोन पॉइन्ट, 21-30 दिवसांत पाच पॉइन्ट आणि 30 दिवसांपेक्षा जादा दिवस झाल्यास दहा पॉइन्ट दिले जात असे. तसेच खोटे उत्तर दिल्याचे निदर्शनास आल्यावर दहा पॉइन्ट दिले जात होते.
ज्या विभागाचे 50 पॉइन्ट झाले त्या विभागाच्या प्रमखास काम करण्याबाबत आयुक्तांकडून पत्र दिले जात होते. 75 पॉइन्ट झाल्यावर कारणे दाखवा नोटीस विभाग प्रमुखास दिली जात होती. तर 100 पॉइन्टनंतर संबंधित विभागाच्या प्रमखाची खातेनिहाय चौकशी करण्यात येत होती. संभाव्या कारवाई टाळण्यासाठी विभागप्रमुख आलेल्या तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण करून घेत होते. ज्या तक्रारी लवकर सोडविण्यात येण्यासारख्या नसल्यास त्याबाबत आयुक्तांची चर्चा करून मार्ग काढण्यात येत होता. दर आठवड्याला होणाऱ्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत सारथीवरील तक्रारींचा आढावा घेतला जात असे. मात्र आयुक्तांच्या बदलीनंतर सारथी तर सुरू आहे. महापालिकेतील एकूण 109 विभागांपैकी 27 विभागप्रमुख पॉइन्टद्वारे मूल्यमापन केल्यास कारवाईस पात्र ठरत आहेत. मात्र त्याचा आढावा घेतला जात नसल्याने सारथीवरील तक्रारींकडे अधिकारी गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे.
पॉइन्टमध्ये आघाडीवर
असलेले दहा विभाग
विभागकाम न झाल्याने मिळालेले पॉइन्ट
पशू वैद्यकीय1,599
अतिक्रमण मुख्य कार्यालय538
“ड’ क्षेत्रीय अतिक्रमण312
वृक्षसंवर्धन287
“अ’ क्षेत्रीय अतिक्रमण266
“फ’ प्रभाग स्थापत्य216
वैद्यकीय मुख्य कार्यालय198
“ग’ प्रभाग अधिकारी175
वाहतूक165