चरेगाव – अंधारवाडी ता. कराड येथे एका एचएफ जातीच्या गाईला लंपीची लागण झाल्याचे समोर आले असून अंधारवाडीत लंपीचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने लंपी बाधित गाईवर तातडीने उपचार सुरू केले असून शेतकर्यांनी घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
गेले काही दिवसांपासून राज्यात जनावरांमध्ये लंपी स्कीनचा प्रादुर्भाव वाढला असून सातारा जिल्ह्यात चार तालुक्यांमधील जनावरांना लंपीची बाधा झाली आहे. लंपी त्वचारोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला; तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. एकीकडे शासनाने जनावरांना आवश्यकतेनुसार लसीकरणासाठी लस व उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध केला आहे. तसेच लंपी संशयित पशुधन आढळल्यास तातडीने त्या ठिकाणी पोहोचून उपचार करावेत व शेतकर्यांचे पशुधन वाचवावे, त्याचबरोबर आजूबाजूच्या जवळपास 5 किलोमीटर परिघामध्ये लसीकरण मोहीम राबवण्याचे शासन आदेश आहेत.
दरम्यान, बुधवार दि. 14 सप्टेंबर रोजी उंब्रज येथे एका भटक्या वळूला लंपी सदृश्य लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्याच्यावरती उंब्रज पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय भोसले यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केले आहेत.
भटका वळू लंपी बाधित झाल्याची घटना अद्याप ताजी असताना शुक्रवार दि. 16 रोजी अंधारवाडी ता. कराड येथील एका एचएफ जातीच्या गायीलाही लंपीची लागण झाल्याचे समोर आले असून गायीवर योग्य ते उपचार सुरू करण्यात असल्याचे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
लंपी संशयित वळू मोकाटच
लंपी संशयित भटक्या वळूवर योग्य उपचार सुरू आहेत. परिसरातील पशुधनाला लसीकरण करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, भटक्या वळूपासून संसर्ग वाढून नये, यासाठी वळूला पकडून क्वारंटाइन करणे गरजेचे असून यासाठी ज्या-ज्या गावांमध्ये वळूचा वावर आहे, त्या ग्रामपंचायतींनी पशुसंवर्धन विभागाला सहकार्य करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याने लंपी संशयित वळू अजूनही मोकाटच फिरत आहे. त्यामुळे भागातील पशुपालकांमध्ये भीतीचे आहे.