बारामती (प्रतिनिधी) – शासकीय नियमांच्या अधीन राहून दुकाने सुरू करता येणार असल्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले असल्याने बारामती शहरातील रस्त्यांवर आज वर्दळ होती. रस्त्यावर वर्दळ असली तरी बारामती शहर मात्र आजही टाळेबंद राहिले. शहरातील काही भागात अद्यापही कंटेनमेंट झोन सुरू असल्याने शहर बंद ठेवण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले.
शहरातील म्हाडा कॉलनी येथील कंन्टेटमेंट झोन 12 तारखेला संपणार असून बारा तारखेनंतर शासकीय नियमांच्या आदेशानुसार शहरातील दुकाने सुरू होतील. मद्यविक्रीसाठी देखील 12 तारखे नंतरच परवानगी मिळेल असे प्रांत अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बारामतीत मद्यपींना बारा तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दुकाने सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी देखील बारामती शहर मात्र बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील म्हाडा कॉलनी येथे कंटेनमेंट झोन असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन व्यापाऱ्यांना देखील या निर्णयाबाबत अवगत करण्यात आले आहे . त्यामुळे बारा तारखे नंतरच बारामती शहरातील दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. शासनाच्या नियमानुसार 12 तारखेनंतर एका रोडवरील किंवा लेनमधील केवळ पाच दुकानांना एका दिवशी परवानगी दिली जाईल असे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
दारूची दुकाने सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. मात्र कंटेनमेंट झोन सुरू असल्याने बारा तारखे नंतरच शहरातील दारूची दुकाने देखील सुरू होतील असेही प्रांताधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे बारामती शहर व तालुक्यातील मद्यपींना बारा तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे .दरम्यान दुकाने सुरू होणार या निर्णयामुळे बारामतीतील रस्त्यांवर नागरिकांनी आज गर्दी केली. दारूच्या दुकानांसमोर देखील तळीरामांना घिरट्या मारल्या.