उरुळी कांचन, (वार्ताहर) – पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी बेकायदा देशी व विदेशी दारू विक्री करणार्या दोघांना उरुळी कांचन पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून 20 हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
रामदास दिगंबर माने (वय 52, रा. शिंदवणे) व दिलीप पावसाल कोलगे (वय 56, रा. पाटील वस्ती, उरूळी कांचन) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार अक्षय मारूती कामठे व अमोल संजय खांडेकर यानी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. 12) उरुळी कांचन पोलिसांचे पथक उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गावर गस्त घालत होते.
यावेळी हॉटेल आसरा या ठिकाणी एकजण ओळखीच्या नागरिकांना देशी-विदेशी दारू विकत असताना दिसून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे रामदास दिगंबर माने सांगितले. हॉटेलच्या पाठीमागे जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी 16 हजारांच्या बेकायदा देशी व विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी पोलीस हवालदार अक्षय कामठे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एका हॉटेलच्या पाठीमागे दिलीप पावसाल कोलगे हा दारू विक्री करत असताना आढळून आला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 4 हजारांची देशी-विदेशी दारू जप्त केली. दरम्यान, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.