पिरंगुट – गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोषात मुळशी तालुक्यात सात दिवसांच्या सार्वजनिक व घरगुती गणपतींचे यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही गाजबाजा न करता शांततेत विसर्जन झाले. गेले सात दिवस परिसरात भक्तिमय वातावरण होते.
दरम्यान माहेरवाशीण गौराईचेही घरोघरी उत्साहात आगमन झाले. गुरुवारी (दि. 27) दुपारनंतर गणपतीबरोबरच गौराईलाही निरोप देण्यात आला.
मुळशी तालुक्याच्या पूर्व भागातील भूगाव, भूकुम, पिरंगुट, लवळे, चांदे, नांदे, भरे, घोटावडे, कासार आंबोली, अंबडवेट, सुतारवाडी, उरावडे, मुठा खोरे, खारावडे रिहे खोऱ्यातील तसेच पौड, करमोळी, चाले, कुळे, नांदगाव, नाणेगाव व कोळवण खोऱ्यातील विविध तसेच मुळशी खोऱ्यातील विविध गावात सार्वजनिक, तसेच घरगुती गणपतींचे विसर्जन उत्साहात करण्यात आले.