पिंपरी – पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेवर त्यांच्या बहिणीच्या पतीनेच कुऱ्हाडीने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहा वाजता कृष्णानगर, पोलीस लाईन, चिंचवड येथे घडली.
सिंधू कुंडलिक मोहिते (वय 26, रा. कृष्णानगर पोलीस लाईन, चिंचवड) असे जखमी पोलीस कर्मचारी महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनोद हिरामण चव्हाण (वय 35, रा. येलवाडी, देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी विनोद हा फिर्यादी सिंधू यांच्या बहिणीचा पती आहे. विनोद त्याच्या पत्नीला वारंवार मारहाण करत होता. त्यामुळे सिंधू यांनी मध्यस्थी करून बहिणीला माहेरी पाठवले होते. त्याचा राग विनोद याच्या मनात होता. गुरुवारी सायंकाळी विनोद हा सिंधू यांच्या घरी आला.
तू माझ्या बायकोला तिच्या आईकडे का सोडलेस. माझ्या बायकोला माझ्याकडे आणून दे, असे विनोद याने सिंधू यांना दम दिला. यावरून दोघांत बाचाबाची झाली. त्यावर विनोद याने रेनकोटमध्ये आणलेली कुऱ्हाड काढत सिंधू यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये सिंधू यांच्या डोक्यात, मानेवर, हातावर गंभीर दुखापत झाली.