कैरो, ता. 20 – “सुवेझची लढाई जिंकली! आता सुदानची लढाईच काय ती जिंकायची उरली आहे’, असे काल झालेल्या सुवेझ कालव्याबाबतच्या कराराचे कैरो नभोवाणीवर वर्णन करण्यात आले. सुवेझ कालव्याच्या प्रदेशांतून ब्रिटीश सैन्य काढून घेण्याबाबतच्या करारावर काल अँग्लो-इजिप्शीयन प्रतिनिधींनी सह्या केल्या.
हे आनंददायक वृत्त सांगताना सुदानचा उल्लेख करून कैरो नभोवाणी म्हणाली, “सुदानी जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्क इजिप्तने मिळवून दिलाच आहे. त्या विजया मागोमाग आजचा विजय मिळाला आहे. आजच्या विजया मागोमाग सुदानबाबतही इजिप्शीयन सरकार विजयी होईल.’
अरब राष्ट्राच्या संघाने या कराराचे स्वागत केले आहे. इजिप्तचे पंतप्रधान लेफ्टनंट कर्नल अब्देल नासेर आणि इजिप्शीयन जनता हा यांचा प्रचंड विजय आहे, असे अरब लीगचे मत पडले. व्यापारी ब्रिटिश नौकांना सुवेझ कालव्यातून अनिर्बंध जाण्यायेण्याची या करारात मोकळीक देण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचा दहावा वाढदिवस
पुणे – सन 1945 साली जागतिक महायुद्ध संपले. त्यानंतर लागलीच बलाढ्य राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्रसंघाची सॅन फ्रॅन्सिस्को येथे सन 1945 मध्येच स्थापना केली. यासाठी एक करारही करण्यात आला. येत्या दि. 24 ऑक्टोबर 1954 ला या संयुक्त राष्ट्रसंघाला 9 वर्षे पूर्ण होत असून तो 10व्या वर्षांत पदार्पण करीत आहे अशा आशयाचे पुणे महानगरपालिकेचे महापौर श्री. शं. द. उरसळ यांनी आज काढले आहे. ते पुढे म्हणतात,
“जागतिक शांतता, न्याय आणि प्रगती ही तीन मूलक ध्येये संयुक्त राष्ट्रसंघाने अंगिकारली असून त्यांच्या परीपूर्ततेसाठी प्रत्येक राष्ट्राने आपले सर्वस्व पणाला लावले पाहिजे अशी घोषणा केली आहे. त्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे उच्चाटन करणे मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि जागतिक कायदे नि तहनामे यांचे परिपालन करणे ही मुख्य कामे संयुक्त राष्ट्रसंघाची आहेत. जगातील दारिद्य्र, आरोग्य अज्ञान, रोगराई निवारण्यासाठीही मोठे योगदान दिले आहे.