करोना प्रतिबंधात्मक उपायांचे जबाबदारीने पालन करावे; पंतप्रधानांचे जनतेला आवाहन

नवी दिल्ली – देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित रहायला हवा आहे, त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव संपला आहे असा गैरसमज करुन न घेता, करोना प्रतिबंधात्मक उपायांचे जबाबदारीने पालन करण्याचे भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला आज देशवासिंना संबोधित करताना केले.

करोना प्रादुर्भावानंतर आता हळू हळू जीवनचक्र गती घेऊ लागले आहे. देशात आता लॉकडाऊन सारखी परिस्थिती नाही, मात्र तरीही करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आलेला नाही याचे भान आपण जपले पाहिजे, पुर्वपदावर येत असलेल्या आपल्या देशाची गती मंदावू नये यासाठी प्रतिबंधित सुरक्षा उपायाचं पालन करत राहीले पाहिजे असे मोदी म्हणाले.

काही लोक सुरक्षा उपायांच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवत आहे. मात्र असे वागून आपण स्वतःसह आपण आपले कुटुंब, अबाल वृद्ध यांना संकटात टाकत आहोत याची जाणीव त्यांनी नागरिकांना करून दिली.

भारतात जगाच्या तुलनेत करोना प्रादुर्भावाची स्थिती नियंत्रणात आहे. जगातल्या प्रमुख देशांसोबतची तुलनात्मक आकडेवारी मांडून करोनाविरुद्धच्या लढ्यातील भारताचे यशही मोदींनी देशासमोर मांडले. भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे सुमारे साडेपाच हजार लोकांना करोनाची लागण झाली, तर अमेरिका आणि ब्राझीलमधे हेच प्रमाण 25 हजार इतके आहे.

भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे करोना मृत्यूचे प्रमाण 83 इतके आहे, तर अमेरिका ब्राझील स्पेन, ब्रिटनमधे हे प्रमाण 600 इतके जास्त आहे. जगभरातल्या साधनसंपन्न देशांच्या तुलनेत भारत आपल्या जास्तीत जास्त रुग्णांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाबाधित रुग्णांवरच्या उपचारांसाठी देशभरात सध्या 90 लाखाहून अधिक खाटा, 12 हजाराहून अधिक विलगीकरण केंद्र, तर करोना चाचण्यांसाठी सुमारे 2 हजार प्रयोगशाळा उभारल्या आहेत. देश लवकरच 10 कोटी करोना चाचण्यांची संख्या गाठेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देभरातल्या लाखो करोनायोध्यांनी केलेल्या कामगिरीची प्रशंसाही त्यांनी केली.

करोनावरची लस आल्यानंतर, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला ती मिळावी यासाठी केंद्र सरकारने नियोजन सुरू केले आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला सणांचा आनंद घेता आला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत करोनावर लस येत नाही, तोपर्यंत कोणताही निष्काळजीपणा न दाखवता, मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आणि परस्परांपासून सुरक्षित अंतराचे पालन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.