पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दि.18 व दि.19 फेब्रुवारी असे दोन दिवसे पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांचा दौरा होत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. महाराजा शिवछत्रपति प्रतिष्ठानच्यावतीने आंबेगाव बुद्रुक येथे उभारलेल्या “शिवसृष्टी”च्या “सरकारवाडा” या पहिल्या चरणाचा लोकार्पण सोहळा शहा यांच्या हस्ते आज रविवारी झाला.
यावेळी अमित शहा म्हणाले,’देशाच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र पोचविण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे समर्पित भावनेने केले. पुरंदरे यांनी हे काम केले नसते, तर शिवाजी महाराज यांची ओळख तितक्या मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचली नसती. महाराजांच्या जीवनातील उत्तुंग शिखरे जनतेपर्यंत पोचविण्याचे काम पुरंदरे यांनी केले.” असे मत गृहमंत्री व सहकरमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.