#ICCWorldCup2019 : संधी न मिळालेल्या खेळाडूंनी नाराज होवू नये – रवी शास्त्री

नवी दिल्ली – आगामी विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाल्यापासून दिग्गज आजी-माजी खेळाडूंमध्ये संघ निवडीवरून चर्चा होत असताना भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संधी न मिळालेल्या खेळाडूंनी निरश न होण्याचा मोलाचा सल्ला दिला असून आगामी काळात अनेक मोठ्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध असून तुम्ही निराश न होता त्या संधींसाठी तयार रहायला हवे असेही ते म्हणाले.

इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी गेल्या सोमवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूला संघात स्थान मिळू शकले नाही. यावरून वादविवाद, चर्चेला तोंड फुटले. आजी-माजी दिग्गज खेळाडूंनी विविध मते मांडली. हा सगळा वाद सुरू असताना, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या निवड प्रक्रियेत माझा सहभाग नसतो. माझे काही मत असेल तर त्याबाबत कर्णधाराला कळवतो, असे शास्त्रींनी यावेळी नमूद केले.

तुम्हाला 15 खेळाडूंचीच निवड करायची असते, तेव्हा कुणाला तरी संघाबाहेर राहावे लागते. ते दुर्दैवी आहे. ही स्पर्धा मोठी असून, 16 खेळाडूंचा सहभाग असलेल्या संघाची निवड करावी, असे माझे मत होते. याबाबत मी आयसीसीकडेही बोललो होतो. पण 15 खेळाडूच निवडायचे होते, असेही शास्त्रींनी यावेळी स्पष्ट केले. ज्यांना संघात स्थान मिळाले नाही, त्यांना पुढील काळात कधीही संधी मिळू शकते. त्यांनी निराश होऊ नये. या खेळात कुणीही जखमी होऊ शकते. त्यामुळे कधीही तुम्हाला संघ व्यवस्थापनाकडून बोलावणे येऊ शकते, असेही ते म्हणाले. संघातील चौथ्या स्थानासाठी रायुडूचे नाव आघाडीवर असल्याचे विराट काही महिन्यांपूर्वी म्हणाला होता. त्याबाबत शास्त्री म्हणाले, चौथं स्थान कायमच अनिश्‍चित असते. त्या-त्या वेळची परिस्थिती आणि प्रतिस्पर्धी संघ यावर हे स्थान अवलंबून असते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.