ICC Men’s T20 World Cup 2024 :- स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 विश्वकरंडक 2024 मध्ये रोहित शर्मासोबत सलामी करू शकतो. या वर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वकरंडक खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यासंदर्भात गेल्या आठवड्यात मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर उपस्थित होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या बैठकीत रोहितसोबत विराट कोहलीला ओपनिंगची संधी देण्याबाबत चर्चा झाली. वास्तविक, काही काळापूर्वी टी-20 विश्वकरंडक संघात कोहलीच्या स्थानाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वकरंडकानंतर रोहित, द्रविड आणि निवडकर्त्यांची भेट झाली तेव्हा कोहलीचे टी-20 संघात स्थान निश्चित झाले नव्हते, परंतु गेल्या काही महिन्यांत बरेच काही बदलले आहे.
रोहित आणि कोहलीने 2022 च्या टी-20 विश्वकरंडकापासून 2023 च्या वनडे विश्वचषकापर्यंत एकही टी-20 सामना खेळलेला नाही. कोहलीने या वर्षी जानेवारीत अफगाणिस्तानच्या घरच्या मालिकेसाठी स्वत:ला उपलब्ध घोषित केले होते. या मालिकेतून तो आणि रोहित जवळपास दोन वर्षांत प्रथमच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले. त्याने दोन सामन्यांमध्ये त्याच्या आवडत्या क्रमांक-3 वर फलंदाजी केली. या मालिकेत यशस्वी जैस्वालने रोहितसोबत डावाची सुरुवात केली. मात्र, जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील सलामीचे खेळाडू बदलू शकतात.
कोहली ऑरेंज कॅपधारक
कोहली आयपीएलच्या गेल्या काही हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) साठी सलामी देत आहे. या मोसमातही ओपनिंग करताना, तो 147 च्या स्ट्राईक रेटने सात सामन्यांमध्ये 361 धावांसह ऑरेंज कॅपधारक आहे. या काळात त्याने शतकही ठोकले आहे. कोहलीने 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. काही वेळाने तो 3 नंबरच्या स्लॉटवर गेला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून कोहलीचा रेकॉर्ड चांगला आहे. माजी कर्णधाराने 9 सामन्यात 400 धावा केल्या आहेत.