पुणे – मी पुण्यात नेहमी येत असल्याने पुण्याच्या जवळ येत असल्याचे बोलले जाते. मात्र, असे असले तरी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. यामुळे भाजपच्या पुण्यातील इच्छुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांच्या इच्छा पल्लवीत झाल्या आहेत.
पुण्यात शनिवारी (दि.९) झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजपचे पुण्यातील सर्व इच्छूक झाडून उपस्थित होते. पुणे लोकसभा मतदार संघ हा राज्यातील एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. तो ताब्यात ठेवून त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा असते.
दरम्यान, भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांचा भरणा अधिक आहे. दरम्यान, पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक लढविणार असल्याची चर्चा पसरली होती. मात्र, मोदी हे वाराणसीतूनच लढणार आहेत. त्यानंतर फडणवीसांच्या उमेदवारीची चर्चा मात्र कायम होती. अखेर फडणवीस यांनी स्वत:च आपण पुण्यातून लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. य़ामुळे भाजपच्या अन्य इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे.
पुण्यात आणखी एक नवीन विमानतळ
रस्ते वाहतूक व अन्य वाहतूक साधनांमुळे पुणे ते मुंबई हे अंतर कमी झाले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास दोन तासांत साध्य करता यावा, यासाठी रिंगरोडचा पर्याय राबविण्यात येणार आहे. पुणे ते नागपूर हे अंतरही कमी करण्यासाठी काही प्रकल्प राबविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण होणार आहे. आगामी तीन-चार वर्षांत पुण्यात आणखी एक नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची आवश्यक भूसंपादन कार्यवाहीही पूर्ण करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.